रोझेनश्ट्रास्स

       मानवाच्या ईतिहासात अहिंसक लढे अनेक झाले आणि पुढे होतीलही, परंतू नाझी जर्मनीत, नाझींच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बर्लीन मधे, गेस्टापोंच्या मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर, “आर्यवंशीय” जर्मन स्त्रियांनी नाझी सरकार विरोधी  अहिंसक चळवळ यशस्वी करुन दाखवली. त्याघटनेची माहिती करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
       या घटना १९४३ मधली आहे, फेब्रुवारी मधे दुसर्‍या महायुद्धास कलाटणी देणार्‍या स्टालिनग्राडच्या लढाईत जर्मन सैन्याला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली, यामुळे बिथरलेल्या नाझी नेतृत्वाने बर्लीन मधील उरल्या-सुरल्या ज्युंना अटक करायला सुरुवात केली. जर्मनीतील बहुतेक ज्युंना तोपर्यंत छळछावण्यांत पाठविण्यात आलेले होते परंतू उरलेल्या काहीं ज्युंना म्हणजे वृद्ध, पहिल्या महायुद्धातील गौरवप्राप्त सैनीक, जर्मन आर्यवंशीयांशी लग्न केलेले ईत्यादींना मात्र त्यातून सुट मिळाली होती. २७-२८ फेब्रुवारी मधे या सगळ्यांना पकडण्याची “फॅक्टरी अॅक्शन” नामक कारवाई पार पाडण्यात आली व त्या अंतर्गत ८००० ते १०००० ज्युंना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बंदिवासात ठेवण्यात आले. बर्लीनमधे ही कारवाई २८ फेब्रुवारीच्या सकाळी पुर्ण झाली व अंदाजे २००० कैद्यांना रोझस्ट्रीटवर असलेल्या ईमारतीत बंदिस्त केले गेले. हळूहळू ही बातमी बर्लीनभर पसरली व दुपारपर्यंत अटक केलेल्या ज्युंचे “आर्यवंशीय” जर्मन नातेवाईक इमारती बाहेर जमू लागले संध्याकाळपर्यंत यात भर पडत गेली व जवळजवळ १००० जणांचा जमाव जमला, त्यांत बव्हंशी महिला होत्या. सुरवातीला शांत असलेल्या या जमावाने नंतर घोषणा देण्यास सुरुवात केली, आणि कैद्यांच्या सुटकेची मागणी होत असतानाच हळूहळू निदर्शनांचे रुपांतर धरण्यात झाले. रात्रीच्या वेळेस निदर्शक महिलांच्या संखेत जरी घट होत असली तरिही दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढच होत गेली आणि त्यांचा आकडा ६००० पर्यंत पोचला.
सुरवातीला गोंधळलेल्या गेस्टापोंनी त्यांना ईमारतीत शिरण्यापासून फक्त रोखले होते, पण जसजश्या निदर्शकांच्या घोषणा वाढल्या व त्या तेथून हटायला तयार नाहित हे लक्षात आल्यावर गेस्टापों त्यांना धमकावू लागले व तेथून निघून जायला सांगू लागले. पण या धमक्यांचा व समजावण्याचा काहीही उपयोग झाला नाही, शेवटी ४ मार्चला गेस्टापोंनी मशिनगन आणून त्या निदर्शिकांवर रोखल्या व त्यांना ताबडतोब निघून जा नाहितर सगळ्यांवर गोळ्या झाडू असे सांगितले. मशिनगन पाहून सगळ्याजणी घाबरल्या व थोडावेळासाठी शांतता पसरली पण थोड्या वेळांत त्यांनी पुन्हा धैर्य गोळा करुन “मर्डरर्स, मर्डरर्स” अशा घोषणा देण्यास सुरवात केली. निदर्शिकांवर काहीही परिणाम होत नाही हे पाहून नाईलाजाने मशिनगन तेथून हटवल्या गेल्या आणि आंदोलकांना त्यांचे पहिले यश मिळाले. याघटने नंतर आंदोलकांची संख्या उत्तरोत्तर वाढतच गेली व आंदोलन आटोक्यात येत नाही हे स्पष्ट झाल्यावर ६ मार्चच्या सकाळी, गोबेल्सच्या आदेशानुसार सर्व ज्युंना सोडून देण्यात आले व जर्मन महिलांनी नाझींविरोधात दिलेला एकमेवद्वितीय अहिंसक लढा यशस्वी झाला.

या घटनेत गोबेल्सची भुमिका –
या कालावधीत नाझी सरकारात प्रसारण मंत्री व पक्षाचा बर्लीन शहर प्रमुख असलेल्या जोसेफ गोबेल्स ने हिटलरच्या वाढदिवसापुर्वी (२० एप्रील) बर्लीनला ज्यु-मुक्त करण्याचा विडा उचलला होता. त्यानुसार ८ ते १० हजार ज्युंना अटक करण्यात आले व त्यांची रवानगी छळछावण्यांकडे करण्यात आली. परंतू यातील जवळपास २००० कैदी जे आर्यवंशीय जर्मनांचे नातेवाईक होते, त्यांच्या पत्नींनी केलेले आंदोलन अहिंसक व शांततापुर्ण मार्गाने होत असल्यामुळे गोबेल्सची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली. बायकांचे हे आंदोलन बलपूर्वक दडपता येत नाही की समजावून वा धमकावून त्या ऐकत नाहीत, यामुळे सर्व कैद्यांना सोडून देण्या शिवाय त्याच्याकडे अन्य पर्याय उरला नाही.

या आंदोलकांना मिळालेल्या यशाची कारणे –
१. आंदोलन अहिंसक असल्यामुळे बलप्रयोगाने दडपण्याचे निमित्त नाझींना मिळाले नाही. जर आंदोलकांनी गेस्टापोंवर दगडफेक केली असती वा हिंसक हल्ले करुन कैद्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर नाझींना त्यांच्यावर गोळीबार वा लाठीहल्ला करुन आंदोलन मोडून काढले असते किंवा निदर्शकांना अटक करुन आंदोलन संपवले असते. अशाप्रकारे आंदोलने वा चळवळी मोडून काढण्याचा अनुभव व सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच होते आणि अशा कृतीस जर्मन जनतेचा पाठिंबा देखील मिळाला असता. पण अहिंसक व निशस्त्र अशा आर्यवंशीय स्त्रियांवर अशी कारवाई करणे अथवा त्यांना शारिरीक ईजा केल्यास वा कैदेत टाकल्यास त्याचे जर्मन जनतेसमोर समर्थन करणे फार अवघड होते.
२. आंदोलनाची वेळ नाझिंसाठी चुकीची होती. कारण यासुमारास दुसर्‍या महायुद्धाचे पारडे फिरले होते, तोपर्यंत अजिंक्य असलेल्या हिटलरच्या नाझी सैन्याला स्टालिनग्राडमधे पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पहावे लागले व कधी नव्हे ते जर्मन जनतेत नाझी पक्ष अप्रीय होऊ लागला होता. अशा परिस्थीतीत शांततापुर्ण मार्गांने निदर्शने करणार्‍या आर्यवंशीय महिलांवर नाझींनी कारवाई केल्याची वा त्यांना अपाय केल्याच्या बातमीमुळे जर्मन जनते मधे नाझी व हिटलर विरुद्ध तिरस्काराची भावना मुळ धरेल, अपकिर्ती होईल व त्याचा परिणाम जर्मनीच्या युद्ध क्षमतेवर होईल अशी भिती होती.
३. आंदोलनात भाग घेतलेल्यांचे धैर्य व धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपल्या विरोधकांना (कम्युनिस्ट व ईतर) व नावडत्या लोकांना (ज्यु, जिप्सी, ई.) ठार मारुन वा छळछावन्यांत त्यांची रवानगी करुन संपवण्यासाठी नाझी प्रसीद्ध होते. अशा क्रुर राजवटी समोर उभे राहण्याचे धाडस त्यांनी दाखवले हे कौतुकास्पद आहे.

रोझेनश्ट्रास्स आंदोलनाची दखल व आठवण –
एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की या आगळ्यावेगळ्या व नाझींविरुद्ध असुन यशस्वी झालेल्या अहिंसक आंदोलनाकडे ईतिहासकारांनी व जर्मन जनतेने अक्षम्य दुर्लक्ष का केले असावे? माझ्या मते याची तीन कारणे असावित.
१. एकतर या आंदोलनास सुप्रसीद्ध व वलयांकीत असणारे तर सोडा, खरे म्हणजे कोणाचेच नेतृत्व नव्हते. काही बायकांनी स्वयंस्फुर्तीने केलेली निदर्शने असेच याचे स्वरुप शेवटपर्यंत राहिले. त्यामुळे तत्कालीन वर्तमानपत्रांतून व ऐतिहासीक कागदपत्रांतून फारशी प्रसीद्धी मिळाली नसावी.
२. ’स्त्रियांना राजकारणाची समज कमी असते’ किंवा ’स्त्रियांना राजकारणातलं कळत नाही’ याप्रकारच्या गैरसमजातुन त्यांची राजकारणातील भुमिका दुय्यम मानली जाते. त्यामुळे काही स्त्रियांनी एकत्र येउन केलेल्या या आंदोलनाकडे काहिसे अविश्वासाने पाहिले गेले.
३. दुसर्‍या महायुद्ध कालीन जर्मन जनतेवर एक आरोप केला जातो की, हिटलर व नाझिंनी केलेल्या वंशसंहार व युद्धास बहुसंख्यांचे समर्थन होते व आर्यवंशींयांचे साम्राज्यास व्हावे अशी त्यांची सुप्त ईच्छा  होती, यामुळेच नाझीं विरुद्ध उठावाचे विषेश व व्यापक प्रयत्न झाले नाहित. यावर जर्मनांकडून कारण दिले जाते की ’निशस्त्र व अल्पसंख्य नाझी-विरोधक सामर्थ्यशाली व क्रुर नाझी सरकारचा विरोध करणे त्यांना शक्य नव्हते’. पण रोझेनश्ट्रास्स आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सबबीचा फोलपणा उठून दिसतो, म्हणुन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची वा नाकारण्याची प्रवृत्ती दिसून येते. आपल्या भुमिकेला वा विचारसरणीला सोयिस्कर नसलेल्या ईतिहासाकडे एकतर दुर्लक्ष करायचे अथवा नाकारायचे ही प्रवृत्ती जगभर दिसून येते त्याचेच एक जर्मन उदाहरण म्हणून याप्रकरणाकडे पाहता येईल.

       जर्मन शिल्पकार एंगबर्ग हझिंजर हिने या आंदोलनाची आठवण म्हणून काहि शिल्पे बनवली ती आजसुद्धा रोझेनश्ट्रास्स जवळील एका बागेत ठेवण्याता आली आहेत. त्याची काही चित्रे विकीमेडीयाच्या सौजन्याने –

Rosenstrasse Denkmal 1

Rosenstrasse

संदर्भ –
http://www.luise-berlin.de/bms/bmstxt00/0009prok.htm
http://en.wikipedia.org/wiki/Rosenstrasse_protest
http://www.rosenstrasse-protest.de/texte/texte_stoltzfus.html
http://www.chambon.org/rosenstrasse_en.htm
http://www.owlnet.rice.edu/~rar4619/rosenstrasse.html

या विषयावर “Rosenstrasse” नावाच्या जर्मन भाषेतील चित्रपटाची माहिती येथे पाहता येईल - http://www.imdb.com/title/tt0298131/

1 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

Information in Marathinice information sir

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी मराठीत लिहीण्यासाठी खालील बॉक्स मधे टाईप करा व नंतर ते वर चिकटवा


Related Posts Plugin for WordPress, Blogger...