भारतियांना अभिमान वाटावे असे काही...

       काही दिवसांपूर्वी एका हिंदूत्ववादी मित्राने एक ढकलपत्र (फॉरवर्ड केलेली ई-मेल) पाठवले. नेहेमीप्रमाणे त्यात भारतीय संस्कृतीची तोंड फाटेस्तोवर स्तुती केलेली होती, पण त्यातील एकदोन अपवाद सोडता बाकीचे सर्व मुद्दे सपशेल चुकीचे होते तर काहिं मध्ये पराचा कावळा केलेला होता, यापुर्वी आलेल्या तसल्या (भारतीय संस्कृती अभिमानी) मेल सारखीच ही मेल देखील उडवून लावली, पण नंतर मी विचारात पडलो. भारतीयांना अभिमान वाटावा असे काहीच नाही का? ५००० वर्षे मनुष्यवस्ती असणार्‍या देशाची जगाला देणगी काहीच नाही हे कसे शक्य आहे? आणि थोडा वेळ शांत बसून विचार केला आणि जे आठवेले ते मुद्दे लिहून काढले आणि थोडे आंतरजालावर शोधले व एक यादी तयार केली, ती ब्लॉग वाचकांपर्यंत पोचविणे हा या पोस्टचा उद्देश आहे.

सिंधू संस्कृती -
       नियोजनपुर्वक वसवलेली शहरे आणि त्यांत सरळ व एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, सिंधू नदीकाठी व समुद्रकिनारी धक्क्यांसहित बंदरे व त्यांना ईतर शहरांशी जोडणारे हमरस्ते. यासोबत मानवाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्हाणिघर व शौचालये असणारी घरे आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी मॅनहोलसहित गटारे, सिंधू संस्कृतीत पहायला मिळतात. सार्वजनीक न्हाणीघरे, मुख्य रस्ते व त्यांना जोडलेले छोटे रस्ते, धान्याची गोदामे, आणि बोटींसाठी धक्के बनवणारे प्राचीन संस्कृतीतील लोक ई. स. पुर्व ३३०० ते १३०० याकाळात सिंधू नदीच्या खोर्‍यात (बलुचीस्तान ते पश्चिम राजस्थान आणि उत्तरेस जम्मु ते दक्षिणेस गुजरात) नांदत होते. यासंस्कृतीचा सर्वोच्च काळ ई.स. पुर्व २६०० ते १९०० दरम्यान होता असे मानले जाते.

चार धर्मांचे उगमस्थान -
       भारतात चार धर्मांचा (उपासना पद्धती) जन्म झाला. हिंदू, बौद्ध, जैन, शिख आणि यांच्या शिवाय आदिवासी जमातींचे आपापले वेगवेगळे देव-देवता व उपासनेचे प्रकार आहेत.

प्राचीन व पवित्र शहर काशी -
       जेरुसलेमच्या जोडीने “पवित्र शहर” म्हणून काशीचे नाव घेतले जाते. भगवान शंकराने वसविलेली काशी तेथील गंगा नदीकाठी होणारया कुंभमेळ्यामुळे व तिर्थस्थानांमुळे हिंदूंना पवित्र आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन झाले व संघाची स्थापना येथे केली म्हणून बौद्धांना तर जैनांच्या २४ पैकी तीन तिर्थंकरांचा जन्म येथे झाल्यामुळे काशी जैनांना देखील पवित्र आहे.
       तसेच जगातील सर्वांत जुन्या व सलग वसाहत असलेल्या शहरांपैकी काशी एक आहे.

गणित, अंकपद्धती, शून्य व दशमान पद्धत –
       बिजगणिताची पायाभरणी भारतात झाली आणि भारतीय गणितज्ञांनी विकसीत केलेली अंकपद्धती, शून्य व दशमान पद्धत नंतर अरबांनी स्विकारली आणि त्यांचा प्रसार उर्वरीत जगात केला. यामुळेच सध्या जगभर वापरल्या जाणारे अरेबीक अंक मुळात भारतीय आहेत.

आयुर्वेद –
       केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर जगातली पहिली प्लॅस्टीक सर्जरी करण्याचा मान भारतीय शल्यचिकीत्सकांकडे जातो. याशिवाय पहिले लसीकरण (देवी रोगावरील लस). नैसर्गीक उपचार पद्धती चा वापर व योगासने भारतीयांनी विकसीत केली.

भारतीयांनी कामशास्त्राची माहिती देणारे “कामसुत्र” व “अनंगरंग” सारखे ग्रंथ लिहिले.

कापसाच्या धाग्यांपासून कापड तयार करण्यास भारतात सुरुवात झाली.

ईसवीसनाच्या चौथ्या शतकात साखरेचा शोध भारतीयांनी लावला.

आधुनिक बुद्धीबळाचा पुर्वज चतुरंग या खेळाचा शोध व विकास भारतात झाला.

जगातील ७ आश्चर्यांपैकी एक “ताजमहाल”, भारताची शान आहे.

       जगातील सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे. २००९ च्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी मतदारांची संख्या ७१ कोटीपेक्षा जास्त होती जी युरोपीयन युनियन व अमेरिकेच्या एकुण मतदारांच्यासंखेपेक्षा जास्त आहे.

माहिती साठी मदत - http://en.wikipedia.org/wiki/What_the_Ancients_Did_for_Us
Related Posts Plugin for WordPress, Blogger...