एका क्रांतीकारकाचे मतपरिवर्तन

       परदेशात जाउन तेथुन मायदेशातील क्रांतीकारकांना मदत करणे व त्यायोगे ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उलथवून टाकणे, या उद्देशाने स्थापन झालेल्या गदर पार्टीचे एक संस्थापक लाला हरदयाळ यांचे नंतर मतपरिवर्तन झाले. आणि त्यांनी त्यामागच्या वैचारिक प्रवासाची कहाणी "फोर्टी फोर मन्थ्स ईन जर्मनी अ‍ॅण्ड टर्की" या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकाची ओळख करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.

       १९०५ मधे शिष्यवृत्तीवर ऑक्सफर्ड मधे शिकायला गेलेल्या लाला हरदयाळ यांनी १९०७ मधे ICS परीक्षेची तयारी सोडून दिली व भारतात परतले, पण इथे आल्यावर त्यांच्या प्रक्षोभक लिखाणामुळे त्यांनी ईंग्रज सरकारचा रोष ओढवून घेतला आणि लि़खाणावर बंदी येईल व तुरुंगात जावे लागेल असे दिसू लागल्याने त्यांनी १९०९ मधे भारत सोडला व ते युरोपात गेले. त्यांनी पॅरिस व अल्जेरियात काही काळ काढला आणि १९११ मधे अमेरिकेस गेले, येथे त्यांचा संबंध अराजकवाद्यांशी आला पण त्यामुळे अमेरिकन सरकारने त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना अमेरिका सोडून १९१४ मधे जर्मनीस जावे लागले.

       अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी स्थलांतरीत भारतीयांची संघटना स्थापली, जी नंतर "गदर पार्टी" या नावाने ओळखली जाउ लागली, या संघटनेच्या गदर पत्राचे ते संस्थापक संपादक होते. भारतात सशस्त्र लढा उभारुन ईंग्रजांना पळवून लावणे हे मुख्य उद्दीष्ट असल्यामुळे गदर पार्टीमार्फत भारतातील क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे पाठवली जात असत, कामागाटामारु प्रकरणात या पार्टीने मोठी भुमिका बजावली होती. लाला हरदयाळ १९१४ मधे जर्मनीत पोचल्यानंतर बर्लीन मधील भारतीय क्रांतीकारकांच्या गटात सामील झाले. यासुमारास त्यांचे जर्मनी व तुर्कस्तान मधे अनेक शहरांत वास्तव्य होते. साडेतीन वर्षांच्या या कालावधीत त्यांनी दोन्ही देशांतील अधिकारी व सामान्य नागरिकांशी संवाद साधला, व त्याचा परिणाम म्हणून ब्रिटीश, फ्रेंच व त्यांच्या साम्राज्याविषयीच्या मतामधे आमुलाग्र बदल झाला. हे परिवर्तन कसे झाले व त्याची कारणे त्यांनी "Fourty Four Months In Germany and Turkey" या पुस्तकात दिली आहेत.

       पुस्तकाच्या सुरवातीस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की, भारत व ईजिप्त मधील जनतेच्या भल्यासाठी मी माझे विचार येथे मांडत आहे, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत, मी कुठल्याही पुस्तकात वा वर्तमानपत्रात छापून आलेली माहिती देत नसून गेल्या साडेतीन वर्षांत माझ्या कानांनी जे ऐकले व डोळ्यांनी जे पाहिले तेच लिहित आहे. आणि या नंतर येतात साडेतीन वर्षांत त्यांनी ऐकलेल्या गोष्टी, घडलेल्या चर्चांतील वाक्ये, त्यांना आलेल्या पत्रांतील मजकूर ईत्यादीं मधून दिसणारा जर्मन व तुर्की समाजाचा आपल्याला परिचित नसलेला चेहरा व त्यामागे असलेले स्वभाव आणि त्यावर लाला हरदयाळ यांचे रोखठोक भाष्य आणि त्यांची ईतर राष्ट्रांतील (प्रामुख्याने फ्रेंच व ब्रिटीश) जनमानसाशी केलेली तुलना, आणि असे करत असतांना त्यांनी फार कठोर शब्दांत टिका केलेली आहे. उदाहरणार्थ "But I found that every German, high and low, rich and poor, suffers from this curious mental derangement". आणि तुर्कांविषयी देखील अशीच रोखठोक भाषा वापरत त्यांनी लिहिलेय; "The Turks could not sing or speculate, as they are really very low in the scale of mental evolution. Nature has not endowed them with brains". त्यांनी जर्मन व तुर्कांवर केलेले असे अनेक प्रहार पुस्तकात पानोपानी आहेत. यासोबत तुर्की खिलाफतीस पाठिंबा देणार्‍या मुसलमानांना सुनावताना ते म्हणतात, "The Muslims of India and Egypt must realise their own privileged position, and disclaim all connection with Central Asian freebooters", त्यांच्या मते जगभरच्या मुसलमानांनी तुर्कांऐवजी ईंग्रज व फ्रेंचांची मदत घेउन स्वतःचा विकास साधाला पाहिजे.

       लाला हरदयाळ पुस्तकात या दोन देशांचे वा समाजांचे एक वेगळे चित्र आपल्याला दाखवतात, ज्याचा उल्लेखदेखील आपल्याकडच्या साहित्यात वा ईतिहासाच्या पुस्तकांत आढळत नाही, त्यामुळे एक वाचक म्हणून आपल्याला जोरदार धक्का बसतो. परंतु कोणा वाचकाला असे वाटणे स्वाभाविक आहे की स्वतःला आलेल्या काहि कटू अनुभवांमुळे चिडून हरदयाळांनी असे लिखाण केले असावे. त्यात तथ्य असुही शकेल परंतु पुस्तकात सुरवातीला दिल्या प्रमाणे महायुद्धाचा लागलेला निकाल व त्याची पुस्तकात सापडणारी कारणे, मित्रराष्ट्रांचे सहकार्य नसणे व व्याप्त प्रदेशातील जनतेची सहानुभुती गमावणे आदि गोष्टींसोबत नंतर काही वर्षांनी ज्या प्रकारे हिटलरने सत्ता काबीज केली व बहुसंख्य जर्मनांचा त्याला मिळालेला पाठिंबा व त्याचे पर्यवसान जर्मनीच्या विनाशात झालेले पाहिले की लाला हरदयाळ सत्य सांगत असुन त्यांच्या द्रष्टेपणाचे कौतुक वाटते. यासोबत पुस्तक वाचल्यानंतर ईतिहासातल्या बर्‍याच कोडयांचा उलगडा होतो. उदा.
- तीन वर्षे जर्मनीत राहिल्या नंतर सुभाषचंद्र बोस जर्मनी सोडून जपान्यांकडे गेले. याचे कारण त्यांनाही पुस्तकात वर्णिल्याप्रमाणे वागणूक जर्मनांकडून मिळाली असली पाहिजे.
- नाझी पक्षाला जर्मन जनतेकडून अपवाद वगळता विरोध झाला नाहि किंवा नाझीं विरोधात व्यापक जनचळवळही उभी राहीली नाही. याचे कारण हिटलर जर्मनांच्या वांशीक अहंकाराला कुरवाळत असे, म्हणून बहुसंख्य जर्मनांना हिटलरशाही मान्य असावी असे वाटते आणि पुस्तकातले सर्वसामान्य जर्मनांचे वर्णन याला पुष्टी देते.
- सामरिक दृष्ट्या दैदिप्यमान कामगिरी करुनसुद्धा दोन्ही महायुद्धांत जर्मनांना पराभव का पत्करावा लागला? विरोधी देश व स्वतःच्या सामर्थ्या विषयी जर्मनांच्या मनात चुकीची धारणा होती हे दिसुन येते.
- सुसंस्कृत व आधुनिक जर्मनांकडून ज्युंचे हत्याकांड कसे घडले? खरेतर जर्मनांनी स्वतःविषयी वृथा अभिमान व ईतरांप्रती घृणा मनात बाळगल्याचे पुस्तकात दिसून येते, झालेले हत्याकांड हा त्याचाच परिणाम असावा.

या पुस्तकातून आपल्याला शिकण्यासारखे काय आहे.
       राष्ट्राची वा समाजाची मानसिकता जर्मन व तुर्कांसारखी नसावी. पुस्तकात जसे जर्मन व तुर्कांचे वर्णन सांगितले गेले आहे तशी स्थिती भारतीयांची होउ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण तत्कालीन जर्मन समाजात दिसणार्‍या अपप्रवृत्ती आपल्याकडेही आहेत त्यांना रोखले पाहिजे.

       पुस्तकाच्या शेवटच्या "निष्कर्ष" या प्रकरणात त्यांनी भारतीयांना सल्ला दिला आहे की; "England is free and great, and we can share in this freedom and greatness as worthy citizens of the greatest State that the world has yet seen". या पुस्तकाला ९० वर्षे होउन गेलीत तरिदेखील त्यातील विचार आजदेखील मननीय व अनुकरणीय आहेत, आणि भारतीयांना जर स्वतःची उन्नती साधायची असेल तर त्यांनी ईंग्रजांचा कित्ता गिरवला पाहिजे यात काहिही संशय नाही.

पुस्तक येथे उपलब्ध आहे.

रोझेनश्ट्रास्स

       मानवाच्या ईतिहासात अहिंसक लढे अनेक झाले आणि पुढे होतीलही, परंतू नाझी जर्मनीत, नाझींच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बर्लीन मधे, गेस्टापोंच्या मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर, “आर्यवंशीय” जर्मन स्त्रियांनी नाझी सरकार विरोधी  अहिंसक चळवळ यशस्वी करुन दाखवली. त्याघटनेची माहिती करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
       या घटना १९४३ मधली आहे, फेब्रुवारी मधे दुसर्‍या महायुद्धास कलाटणी देणार्‍या स्टालिनग्राडच्या लढाईत जर्मन सैन्याला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली, यामुळे बिथरलेल्या नाझी नेतृत्वाने बर्लीन मधील उरल्या-सुरल्या ज्युंना अटक करायला सुरुवात केली. जर्मनीतील बहुतेक ज्युंना तोपर्यंत छळछावण्यांत पाठविण्यात आलेले होते परंतू उरलेल्या काहीं ज्युंना म्हणजे वृद्ध, पहिल्या महायुद्धातील गौरवप्राप्त सैनीक, जर्मन आर्यवंशीयांशी लग्न केलेले ईत्यादींना मात्र त्यातून सुट मिळाली होती. २७-२८ फेब्रुवारी मधे या सगळ्यांना पकडण्याची “फॅक्टरी अॅक्शन” नामक कारवाई पार पाडण्यात आली व त्या अंतर्गत ८००० ते १०००० ज्युंना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बंदिवासात ठेवण्यात आले. बर्लीनमधे ही कारवाई २८ फेब्रुवारीच्या सकाळी पुर्ण झाली व अंदाजे २००० कैद्यांना रोझस्ट्रीटवर असलेल्या ईमारतीत बंदिस्त केले गेले. हळूहळू ही बातमी बर्लीनभर पसरली व दुपारपर्यंत अटक केलेल्या ज्युंचे “आर्यवंशीय” जर्मन नातेवाईक इमारती बाहेर जमू लागले संध्याकाळपर्यंत यात भर पडत गेली व जवळजवळ १००० जणांचा जमाव जमला, त्यांत बव्हंशी महिला होत्या. सुरवातीला शांत असलेल्या या जमावाने नंतर घोषणा देण्यास सुरुवात केली, आणि कैद्यांच्या सुटकेची मागणी होत असतानाच हळूहळू निदर्शनांचे रुपांतर धरण्यात झाले. रात्रीच्या वेळेस निदर्शक महिलांच्या संखेत जरी घट होत असली तरिही दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढच होत गेली आणि त्यांचा आकडा ६००० पर्यंत पोचला.
सुरवातीला गोंधळलेल्या गेस्टापोंनी त्यांना ईमारतीत शिरण्यापासून फक्त रोखले होते, पण जसजश्या निदर्शकांच्या घोषणा वाढल्या व त्या तेथून हटायला तयार नाहित हे लक्षात आल्यावर गेस्टापों त्यांना धमकावू लागले व तेथून निघून जायला सांगू लागले. पण या धमक्यांचा व समजावण्याचा काहीही उपयोग झाला नाही, शेवटी ४ मार्चला गेस्टापोंनी मशिनगन आणून त्या निदर्शिकांवर रोखल्या व त्यांना ताबडतोब निघून जा नाहितर सगळ्यांवर गोळ्या झाडू असे सांगितले. मशिनगन पाहून सगळ्याजणी घाबरल्या व थोडावेळासाठी शांतता पसरली पण थोड्या वेळांत त्यांनी पुन्हा धैर्य गोळा करुन “मर्डरर्स, मर्डरर्स” अशा घोषणा देण्यास सुरवात केली. निदर्शिकांवर काहीही परिणाम होत नाही हे पाहून नाईलाजाने मशिनगन तेथून हटवल्या गेल्या आणि आंदोलकांना त्यांचे पहिले यश मिळाले. याघटने नंतर आंदोलकांची संख्या उत्तरोत्तर वाढतच गेली व आंदोलन आटोक्यात येत नाही हे स्पष्ट झाल्यावर ६ मार्चच्या सकाळी, गोबेल्सच्या आदेशानुसार सर्व ज्युंना सोडून देण्यात आले व जर्मन महिलांनी नाझींविरोधात दिलेला एकमेवद्वितीय अहिंसक लढा यशस्वी झाला.

या घटनेत गोबेल्सची भुमिका –
या कालावधीत नाझी सरकारात प्रसारण मंत्री व पक्षाचा बर्लीन शहर प्रमुख असलेल्या जोसेफ गोबेल्स ने हिटलरच्या वाढदिवसापुर्वी (२० एप्रील) बर्लीनला ज्यु-मुक्त करण्याचा विडा उचलला होता. त्यानुसार ८ ते १० हजार ज्युंना अटक करण्यात आले व त्यांची रवानगी छळछावण्यांकडे करण्यात आली. परंतू यातील जवळपास २००० कैदी जे आर्यवंशीय जर्मनांचे नातेवाईक होते, त्यांच्या पत्नींनी केलेले आंदोलन अहिंसक व शांततापुर्ण मार्गाने होत असल्यामुळे गोबेल्सची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली. बायकांचे हे आंदोलन बलपूर्वक दडपता येत नाही की समजावून वा धमकावून त्या ऐकत नाहीत, यामुळे सर्व कैद्यांना सोडून देण्या शिवाय त्याच्याकडे अन्य पर्याय उरला नाही.

या आंदोलकांना मिळालेल्या यशाची कारणे –
१. आंदोलन अहिंसक असल्यामुळे बलप्रयोगाने दडपण्याचे निमित्त नाझींना मिळाले नाही. जर आंदोलकांनी गेस्टापोंवर दगडफेक केली असती वा हिंसक हल्ले करुन कैद्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर नाझींना त्यांच्यावर गोळीबार वा लाठीहल्ला करुन आंदोलन मोडून काढले असते किंवा निदर्शकांना अटक करुन आंदोलन संपवले असते. अशाप्रकारे आंदोलने वा चळवळी मोडून काढण्याचा अनुभव व सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच होते आणि अशा कृतीस जर्मन जनतेचा पाठिंबा देखील मिळाला असता. पण अहिंसक व निशस्त्र अशा आर्यवंशीय स्त्रियांवर अशी कारवाई करणे अथवा त्यांना शारिरीक ईजा केल्यास वा कैदेत टाकल्यास त्याचे जर्मन जनतेसमोर समर्थन करणे फार अवघड होते.
२. आंदोलनाची वेळ नाझिंसाठी चुकीची होती. कारण यासुमारास दुसर्‍या महायुद्धाचे पारडे फिरले होते, तोपर्यंत अजिंक्य असलेल्या हिटलरच्या नाझी सैन्याला स्टालिनग्राडमधे पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पहावे लागले व कधी नव्हे ते जर्मन जनतेत नाझी पक्ष अप्रीय होऊ लागला होता. अशा परिस्थीतीत शांततापुर्ण मार्गांने निदर्शने करणार्‍या आर्यवंशीय महिलांवर नाझींनी कारवाई केल्याची वा त्यांना अपाय केल्याच्या बातमीमुळे जर्मन जनते मधे नाझी व हिटलर विरुद्ध तिरस्काराची भावना मुळ धरेल, अपकिर्ती होईल व त्याचा परिणाम जर्मनीच्या युद्ध क्षमतेवर होईल अशी भिती होती.
३. आंदोलनात भाग घेतलेल्यांचे धैर्य व धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपल्या विरोधकांना (कम्युनिस्ट व ईतर) व नावडत्या लोकांना (ज्यु, जिप्सी, ई.) ठार मारुन वा छळछावन्यांत त्यांची रवानगी करुन संपवण्यासाठी नाझी प्रसीद्ध होते. अशा क्रुर राजवटी समोर उभे राहण्याचे धाडस त्यांनी दाखवले हे कौतुकास्पद आहे.

रोझेनश्ट्रास्स आंदोलनाची दखल व आठवण –
एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की या आगळ्यावेगळ्या व नाझींविरुद्ध असुन यशस्वी झालेल्या अहिंसक आंदोलनाकडे ईतिहासकारांनी व जर्मन जनतेने अक्षम्य दुर्लक्ष का केले असावे? माझ्या मते याची तीन कारणे असावित.
१. एकतर या आंदोलनास सुप्रसीद्ध व वलयांकीत असणारे तर सोडा, खरे म्हणजे कोणाचेच नेतृत्व नव्हते. काही बायकांनी स्वयंस्फुर्तीने केलेली निदर्शने असेच याचे स्वरुप शेवटपर्यंत राहिले. त्यामुळे तत्कालीन वर्तमानपत्रांतून व ऐतिहासीक कागदपत्रांतून फारशी प्रसीद्धी मिळाली नसावी.
२. ’स्त्रियांना राजकारणाची समज कमी असते’ किंवा ’स्त्रियांना राजकारणातलं कळत नाही’ याप्रकारच्या गैरसमजातुन त्यांची राजकारणातील भुमिका दुय्यम मानली जाते. त्यामुळे काही स्त्रियांनी एकत्र येउन केलेल्या या आंदोलनाकडे काहिसे अविश्वासाने पाहिले गेले.
३. दुसर्‍या महायुद्ध कालीन जर्मन जनतेवर एक आरोप केला जातो की, हिटलर व नाझिंनी केलेल्या वंशसंहार व युद्धास बहुसंख्यांचे समर्थन होते व आर्यवंशींयांचे साम्राज्यास व्हावे अशी त्यांची सुप्त ईच्छा  होती, यामुळेच नाझीं विरुद्ध उठावाचे विषेश व व्यापक प्रयत्न झाले नाहित. यावर जर्मनांकडून कारण दिले जाते की ’निशस्त्र व अल्पसंख्य नाझी-विरोधक सामर्थ्यशाली व क्रुर नाझी सरकारचा विरोध करणे त्यांना शक्य नव्हते’. पण रोझेनश्ट्रास्स आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सबबीचा फोलपणा उठून दिसतो, म्हणुन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची वा नाकारण्याची प्रवृत्ती दिसून येते. आपल्या भुमिकेला वा विचारसरणीला सोयिस्कर नसलेल्या ईतिहासाकडे एकतर दुर्लक्ष करायचे अथवा नाकारायचे ही प्रवृत्ती जगभर दिसून येते त्याचेच एक जर्मन उदाहरण म्हणून याप्रकरणाकडे पाहता येईल.

       जर्मन शिल्पकार एंगबर्ग हझिंजर हिने या आंदोलनाची आठवण म्हणून काहि शिल्पे बनवली ती आजसुद्धा रोझेनश्ट्रास्स जवळील एका बागेत ठेवण्याता आली आहेत. त्याची काही चित्रे विकीमेडीयाच्या सौजन्याने –

Rosenstrasse Denkmal 1

Rosenstrasse

संदर्भ –
http://www.luise-berlin.de/bms/bmstxt00/0009prok.htm
http://en.wikipedia.org/wiki/Rosenstrasse_protest
http://www.rosenstrasse-protest.de/texte/texte_stoltzfus.html
http://www.chambon.org/rosenstrasse_en.htm
http://www.owlnet.rice.edu/~rar4619/rosenstrasse.html

या विषयावर “Rosenstrasse” नावाच्या जर्मन भाषेतील चित्रपटाची माहिती येथे पाहता येईल - http://www.imdb.com/title/tt0298131/

अहिंसक लढयांचा प्रणेता - जीन शार्प

       अनेक धर्मांच्या नेत्यांनी वा प्रेषितांनी अहिंसेचा पुरस्कार केल्याचे आपल्याला माहित आहेच, उदाहरणार्थ गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि जैन तिर्थंकर. आधुनिक काळात अहिंसक चळवळींची तात्विक बैठक थोरोने आधी घातली व नंतर राजकारणात त्याचा परिणामकारक वापर व तंत्र-मंत्र तयार केले ते महात्मा गांधींनी. आणि त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अहिंसक लढाईचे तंत्र अधिक परिष्कृत करण्याचे काम जीन शार्प यांनी केले, त्यांचा व त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात परिचय करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
       जीन शार्प यांचा जन्म १९२८ मधे अमेरिकेतील ओहायो येथे झाला, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीतून पदवी मिळाल्यानंतर काहिकाळ युद्ध विरोधी चळवळीत भाग घेतला. १९६८ मधे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठातुन राज्यशास्त्रात पी. एच. डी. केली, त्यानंतर हार्वर्ड व मॅसॅच्युसेट्स विद्यापिठां शिवाय त्यांनी जगभरातील अनेक विद्यापिठांत राज्यशास्त्रात अध्यापन केले आहे. विद्यार्थी दशेत असताना भारताच्या स्वातंत्रलढयाशी त्यांचा परिचय झाला आणि महात्मा गांधींच्या कार्य व विचारांपासून प्रेरणा घेऊन शार्प यांनी जगभरातील अहिंसक लढयांच्या अभ्यासास सुरुवात केली. नंतर त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला, वेगवेगळ्या चळवळींत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग घेतला आणि अहिंसक लढयांची माहिती देणारी व त्याबाबत मार्गदर्शन करणारी पुस्तके लिहीली, जी आज अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत. यांतील “१९८ मेथड्स ऑफ नॉनव्हायोलंण्ट अॅक्शन” व “फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमॉक्रसी” ही पुस्तके लोकप्रीय असून व ती पन्नासहून जास्त भाषांत उपलब्ध आहेत. १९८३ मध्ये त्यांनी “अल्बर्ट आईनस्टाईन ईन्स्टिट्यूशन” ची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश “हुकुमशाही, युद्ध, वंशसंहार व दडपशाही यांच्या विरुद्ध अहिंसक लढाईच्या वापराबद्दल संशोधन, त्याचा धोरणात्मक अभ्यास व प्रशिक्षण देणे” असून संस्थेमार्फत अनेक उपक्रम चालविले जातात. उदाहरणार्थ, संस्थेमार्फत जीन शार्प यांची अनेक पुस्तके विविध भाषांत विनामुल्य उपलब्ध करून दिलेली आहेत, पुर्वी घडून गेलेल्या अहिंसक लढायांची चिकित्सा आणि सर्वांगीण अभ्यासास प्रोत्साहन व मदत देणे आणि अशा अभ्यासांची माहिती संकलीत करून प्रसीद्ध करणे. यासोबत अहिंसक लढा देणार्‍या किंवा देऊ ईच्छिणार्‍या व्यक्ती वा गटांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संस्थेतर्फे प्रशिक्षण व मार्गदर्शन ही दिले जाते.
       शार्प यांनी स्वत: अनेक देशांतील कार्यकर्त्यांना मदत, प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले तर काही चळवळींत सामिल होऊन निदर्शनांत किंवा आंदोलनांच्या नियोजनात प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. उदा. ८० च्या दशकात म्यान्मार मधील लष्करशाही विरोधक “डेमोक्रेटिक अलायन्स” च्या स्थापनेत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, त्याबरोबरच स्थानिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, चळवळीची रणनिती ठरविणे ईत्यादी कामे त्यांनी त्यावेळेस केली. तिबेट आणि तैवान मधे चिनच्या कम्युनिस्ट सरकार विरोधी राजकीय पक्षांचे एकत्रीकरणात सहभाग आणि १९८९ मधे झालेल्या बिजींगच्या तिएन-आन-मेन चौकातील आंदोलनाच्या वेळी त्यांनी स्वत: तेथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.
       याव्यतिरिक्त त्यांनी १९९१-९२ मधे लिथुआनिया, लाटव्हिया व एस्टोनिया या देशांच्या स्वातंत्र्ययुद्धातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले, १९९८ मधे सर्बिया मधील मिलोसेव्हिच सरकार विरोधी विद्यार्थ्यांच्या चळवळीस प्रशिक्षण व मार्गदर्शन केले (ज्याची परिणती पुढे मिलोसेव्हिच सरकार कोसळण्यात झाली). २००२ मधे सद्दाम हुसैन विरोधक ईराकींना प्रशिक्षण दिले. २००३ मधे शेवर्दनात्झे विरोधी “रोझ” चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि २००३ साली युक्रेनमधील “ऑरेंज रिव्होल्युशन” साठी आणि ईराण मधील सरकार विरोधकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात जिन शार्प यांच्या अल्बर्ट आईनस्टाईन ईन्स्टिट्युशन चा प्रत्यक्ष सहभाग होता. यातील काही चळवळींना यश प्राप्त झाले तर काही चळवळीं फसल्या वा अपयशी ठरल्या आहेत, उदा. म्यान्मार, व्हेनेझुएला, झिम्बाब्वे व ईराण मधील सरकार विरोधी आंदोलने. जिन शार्प यांच्या हुकुमशाही व लष्करशाही विरोधी (अर्थातच लोकशाहीवादी) भुमिकेमुळे त्यांनी व त्यांच्या संस्थेने हुगो चावेझ, रॉबर्ट मुगाबे, महमूद अहमिदिनेजाद व म्यान्मार मधील लष्करी सरकार व ईतर अनेकांचा रोष ओढावून घेतलेला आहे.
       नुकत्याच झालेल्या ट्युनिशिया व ईजिप्त मधील उठावांत भाग घेतलेल्या काही कार्यकर्त्यांनी जिन शार्प यांच्या संस्थेत प्रशिक्षण घेतले होते, व त्यांनी जिन शार्प यांच्या पुस्तकांचा अरबीत अनुवाद करुन प्रत्यक्ष उठावाच्या वेळेस ती वितरीत केली (“१९८ मेथड्स ऑफ नॉनव्हायोलंण्ट अॅक्शन” या पुस्तकाचा मोठया प्रमाणावर वापर या उठावांत करुन घेण्यात आलेला आहे). ईजिप्त मधील क्रांतीकारकांच्या पावलावर पाउल टाकत येमेन व बहारिन मधील कार्यकर्ते अहिंसेच्या मार्गाने राज्यक्रांती करित आहेत, व यासोबत हे लोण ईतर अनेक अरब देशांत पोचलेले आहे. काही दिवसांत तेथील स्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागेल व जिन शार्प हे नाव पुन्हा पुन्हा आपल्या समोर येत राहिल.
अहिंसक लढाई -
       महात्मा गांधी नेहेमी म्हणत की “अहिंसा हे शुरांचे शस्त्र आहे” आणि त्यांची ही विचारसरणी पुढे नेत जिन शार्प राजकीय चळवळींसाठी अहिंसक मार्गांचा पुरस्कार करतात. त्यांच्या मते अहिंसक चळवळ हे दुसरे तिसरे काहीही नसून अहिंसक युद्धच आहे फक्त येथे पारंपारिक हिंसक शस्त्रांऐवजी सामाजीक, आर्थिक, मानसिक शस्त्रांचा उपयोग करुन उद्दिष्ट साध्य केले जाते. अशा अहिंसक लढाईसाठी प्रसीद्ध नेतृत्वाची गरज नसून उलट मोठा नेता अहिंसक लढाईसाठी घातक ठरायची शक्यता जास्त आहे. याकारणास्तव सामुहिक नेतृत्वावर अधिक भर दिला गेला पाहिजे व जे कार्यकर्ते या लढाईत भाग घेणार आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण मिळायला हवे. लढाईची रणनिती अतिशय विचारपुर्वक आखाली गेली पाहिजे कारण परिस्थितीचे चुकीचे आकलन झाले व त्यावर आधारित चुकिची रणनिती अवलंबली गेली तर उद्दिष्टपूर्ती होत नाही व त्याचा लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपरित परिणाम होतो. अहिंसक शस्त्रे ही पारंपारिक शस्त्रांपेक्षा अधिक परिणाम कारक असतात कारण ती केवळ शत्रुच्या युद्धसामग्रीवर घाव घालित नाही तर ती एका प्रकारे शत्रुच्या युद्धक्षमते व युद्धेच्छेवर घाव घालतात व त्यांच्या सत्तेच्या डोलार्‍यास आतुन पोखरुन टाकत सत्ता राबविणे अवघड करुन टाकतात. यामुळे शत्रूचा शक्तिपात होउन त्याच्या प्रभावाचा व सत्ता राबवण्याच्या क्षमतेचा क्षय होतो. म्हणून रणनिती आखणार्‍यांनी विरोधकांच्या बलाबलाचा फार बारकाईने अभ्यास करावा व योग्य ती शस्त्रे निवडावीत असे शार्प यांचे म्हणणे आहे.
       मानवाच्या ईतिहासात असे अनेक प्रसंग आलेले आहेत जेव्हा अहिंसक मार्गांचा वापर राजकीय वा सामाजिक बदलांसाठी कराण्यात आला होता त्यातील अलीकडच्या काळातील काही लढे व चळवळींची यादी येथे देत आहे.
हुकुमशाही विरोधी –
- १९४४ साली विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या अहिंसक चळवळीमुळे ग्वाटेमालातील जॉर्ज उबिको आणि एल-साल्वाडोर मधील मार्टिनेज या हुकुमशहांनी पलायन केले.
- १९८६ मधे फिलीपाईन्स मधील ’पित' क्रांतीमुळे मार्कोस राजवटीचा अंत झाला.
- पोलंड मधील कम्युनिस्ट राजवटी विरोधी 'सॉलिडॅरिटी' चळवळ.
- २००० मधे निवडणूक गमावलेले परंतू खुर्ची सोडण्यास नकार देणारे सर्बीयाचे अध्यक्ष मिलेसेव्हिच यांना विरोधकांच्या अहिंसक आंदोलनामुळे पराभव मान्य करुन सत्ता सोडावी लागली.
- २०११ मधे ट्युनिशिया, येमेन, जॉर्डन, ईजिप्त, बहारिन, सिरिया, अल्जेरिया येथे अहिंसक आंदोलने झाली, ट्युनिशिया व ईजिप्त मधील सत्ताधार्‍यांनी पलायन केले आहे तर ईतर ठिकाणी आंदोलने अजूनही चालू आहेत.
लष्करी उठाव विरोधी –
- १९२० मधील जर्मन कामगारांचा देशव्यापी संपामुळे ’वायमर प्रजासत्ताक’ उलथवून टाकण्यासाठी झालेले सैनिकांचे बंड अयशस्वी ठरले व बंडाच्या नेत्यांना देश सोडून पलायन करावे लागले.
- १९९१ मधे सोवियत रशिया मधे झालेले गोर्बाचेव्ह यांच्या विरुद्ध झालेले साम्यवादी पक्षाच्या नेत्यांचे बंड जनतेच्या अहिंसक आंदोलना मुळे अपयशी ठरले.
परकीय आक्रमण विरोधी –
- १९२३ मधे व्हर्सायच्या तहातील तरतुदींच्या आधारे फ्रान्सने जर्मनीच्या ताब्यातील र्‍हूर प्रांत ताब्यात घेतल्यावर स्थानीक जर्मन जनतेने अहिंसक उठाव करुन फ्रेंच सरकारला माघार घेण्यात भाग पाडले.
- १९६८ मधे झेकोस्लोव्हाकीयावर सोव्हियत रशिया व तिच्या मित्र देशांनी आक्रमण केल्यानंतर सामान्य जनतेने अहिंसक आंदोलनाद्वारे प्रतिकार केला.
- दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनांविरुद्ध डेन्मार्क, नॉर्वे, ईटली व फ्रान्स मधील जनतेने अहिंसक आंदोलनांद्वारे आपला विरोध दर्शविला होता.
वंश आधारित दडपशाही किंवा वंशवर्चस्ववादी धोरणांचा विरोध –
- १९९१ मधे रशियाच्या वंशवादी धोरणांना विरोध करण्यासाठी लिथुआनिया, लाटव्हिया व एस्टोनिया मधील जनतेने अहिंसक आंदोलने उभारली व स्वातंत्र्य मिळवीले.
मानवी हक्कांसाठी वा सामाजिक अन्यायांविरोधी –
- १९६० च्या दशकात अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या लोकांनी अहिंसक चळवळीने सरकारला नमवून अन्यायी कायदे बदलण्यास भाग पाडले.
- दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट उलथविण्यासाठी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा प्रदीर्घ लढा.

       शार्प यांनी स्वत: व अल्बर्ट आईनस्टाईन ईन्स्टिट्यूशन मार्फत अनेक ऐतिहासीक चळवळी व उठावांचा अभ्यास व विश्लेषण करुन त्यासंबंधीची प्रसीद्ध केलेली माहिती, आणि वर दिलेल्या आणि ईतर अनेक अहिंसक चळवळी व लढयांची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर (http://www.aeinstein.org) अनेक भाषांत मोफत उपलब्ध आहे. त्यांचे दुवे -
पुस्तके डाउनलोड
१९८ मेथड्स ऑफ नॉनव्हायोलंट अॅक्शन
फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमॉक्रसी

जिन शार्प यांच्या भाषणांचे व्हिडीयो –

अहिंसक लढयांविषयी अधिक माहिती येथे पहा -
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolence
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolent_revolution
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolent_resistance

       या पोस्टच्या शेवटी जिन शार्प यांच्या “फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमॉक्रसी” पुस्तकातील मला आवडलेली काही वाक्ये देत आहे
"Violent rebellions can trigger brutal repression that frequently leaves the populace more helpless than before."
By placing confidence in violent means, one has chosen the very type of struggle with which the oppressors nearly always have superiority.

If the guerrillas should finally succeed, the resulting new regime is often more dictatorial than its predecessor due to the centralizing impact of the expanded military forces and the weakening or destruction of the society’s independent groups and institutions during the struggle — bodies that are vital in establishing and maintaining a democratic society.

भारतियांना अभिमान वाटावे असे काही...

       काही दिवसांपूर्वी एका हिंदूत्ववादी मित्राने एक ढकलपत्र (फॉरवर्ड केलेली ई-मेल) पाठवले. नेहेमीप्रमाणे त्यात भारतीय संस्कृतीची तोंड फाटेस्तोवर स्तुती केलेली होती, पण त्यातील एकदोन अपवाद सोडता बाकीचे सर्व मुद्दे सपशेल चुकीचे होते तर काहिं मध्ये पराचा कावळा केलेला होता, यापुर्वी आलेल्या तसल्या (भारतीय संस्कृती अभिमानी) मेल सारखीच ही मेल देखील उडवून लावली, पण नंतर मी विचारात पडलो. भारतीयांना अभिमान वाटावा असे काहीच नाही का? ५००० वर्षे मनुष्यवस्ती असणार्‍या देशाची जगाला देणगी काहीच नाही हे कसे शक्य आहे? आणि थोडा वेळ शांत बसून विचार केला आणि जे आठवेले ते मुद्दे लिहून काढले आणि थोडे आंतरजालावर शोधले व एक यादी तयार केली, ती ब्लॉग वाचकांपर्यंत पोचविणे हा या पोस्टचा उद्देश आहे.

सिंधू संस्कृती -
       नियोजनपुर्वक वसवलेली शहरे आणि त्यांत सरळ व एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, सिंधू नदीकाठी व समुद्रकिनारी धक्क्यांसहित बंदरे व त्यांना ईतर शहरांशी जोडणारे हमरस्ते. यासोबत मानवाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्हाणिघर व शौचालये असणारी घरे आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी मॅनहोलसहित गटारे, सिंधू संस्कृतीत पहायला मिळतात. सार्वजनीक न्हाणीघरे, मुख्य रस्ते व त्यांना जोडलेले छोटे रस्ते, धान्याची गोदामे, आणि बोटींसाठी धक्के बनवणारे प्राचीन संस्कृतीतील लोक ई. स. पुर्व ३३०० ते १३०० याकाळात सिंधू नदीच्या खोर्‍यात (बलुचीस्तान ते पश्चिम राजस्थान आणि उत्तरेस जम्मु ते दक्षिणेस गुजरात) नांदत होते. यासंस्कृतीचा सर्वोच्च काळ ई.स. पुर्व २६०० ते १९०० दरम्यान होता असे मानले जाते.

चार धर्मांचे उगमस्थान -
       भारतात चार धर्मांचा (उपासना पद्धती) जन्म झाला. हिंदू, बौद्ध, जैन, शिख आणि यांच्या शिवाय आदिवासी जमातींचे आपापले वेगवेगळे देव-देवता व उपासनेचे प्रकार आहेत.

प्राचीन व पवित्र शहर काशी -
       जेरुसलेमच्या जोडीने “पवित्र शहर” म्हणून काशीचे नाव घेतले जाते. भगवान शंकराने वसविलेली काशी तेथील गंगा नदीकाठी होणारया कुंभमेळ्यामुळे व तिर्थस्थानांमुळे हिंदूंना पवित्र आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन झाले व संघाची स्थापना येथे केली म्हणून बौद्धांना तर जैनांच्या २४ पैकी तीन तिर्थंकरांचा जन्म येथे झाल्यामुळे काशी जैनांना देखील पवित्र आहे.
       तसेच जगातील सर्वांत जुन्या व सलग वसाहत असलेल्या शहरांपैकी काशी एक आहे.

गणित, अंकपद्धती, शून्य व दशमान पद्धत –
       बिजगणिताची पायाभरणी भारतात झाली आणि भारतीय गणितज्ञांनी विकसीत केलेली अंकपद्धती, शून्य व दशमान पद्धत नंतर अरबांनी स्विकारली आणि त्यांचा प्रसार उर्वरीत जगात केला. यामुळेच सध्या जगभर वापरल्या जाणारे अरेबीक अंक मुळात भारतीय आहेत.

आयुर्वेद –
       केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर जगातली पहिली प्लॅस्टीक सर्जरी करण्याचा मान भारतीय शल्यचिकीत्सकांकडे जातो. याशिवाय पहिले लसीकरण (देवी रोगावरील लस). नैसर्गीक उपचार पद्धती चा वापर व योगासने भारतीयांनी विकसीत केली.

भारतीयांनी कामशास्त्राची माहिती देणारे “कामसुत्र” व “अनंगरंग” सारखे ग्रंथ लिहिले.

कापसाच्या धाग्यांपासून कापड तयार करण्यास भारतात सुरुवात झाली.

ईसवीसनाच्या चौथ्या शतकात साखरेचा शोध भारतीयांनी लावला.

आधुनिक बुद्धीबळाचा पुर्वज चतुरंग या खेळाचा शोध व विकास भारतात झाला.

जगातील ७ आश्चर्यांपैकी एक “ताजमहाल”, भारताची शान आहे.

       जगातील सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे. २००९ च्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी मतदारांची संख्या ७१ कोटीपेक्षा जास्त होती जी युरोपीयन युनियन व अमेरिकेच्या एकुण मतदारांच्यासंखेपेक्षा जास्त आहे.

माहिती साठी मदत - http://en.wikipedia.org/wiki/What_the_Ancients_Did_for_Us
Related Posts Plugin for WordPress, Blogger...