अहिंसक लढयांचा प्रणेता - जीन शार्प

       अनेक धर्मांच्या नेत्यांनी वा प्रेषितांनी अहिंसेचा पुरस्कार केल्याचे आपल्याला माहित आहेच, उदाहरणार्थ गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि जैन तिर्थंकर. आधुनिक काळात अहिंसक चळवळींची तात्विक बैठक थोरोने आधी घातली व नंतर राजकारणात त्याचा परिणामकारक वापर व तंत्र-मंत्र तयार केले ते महात्मा गांधींनी. आणि त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अहिंसक लढाईचे तंत्र अधिक परिष्कृत करण्याचे काम जीन शार्प यांनी केले, त्यांचा व त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात परिचय करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
       जीन शार्प यांचा जन्म १९२८ मधे अमेरिकेतील ओहायो येथे झाला, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीतून पदवी मिळाल्यानंतर काहिकाळ युद्ध विरोधी चळवळीत भाग घेतला. १९६८ मधे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठातुन राज्यशास्त्रात पी. एच. डी. केली, त्यानंतर हार्वर्ड व मॅसॅच्युसेट्स विद्यापिठां शिवाय त्यांनी जगभरातील अनेक विद्यापिठांत राज्यशास्त्रात अध्यापन केले आहे. विद्यार्थी दशेत असताना भारताच्या स्वातंत्रलढयाशी त्यांचा परिचय झाला आणि महात्मा गांधींच्या कार्य व विचारांपासून प्रेरणा घेऊन शार्प यांनी जगभरातील अहिंसक लढयांच्या अभ्यासास सुरुवात केली. नंतर त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला, वेगवेगळ्या चळवळींत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग घेतला आणि अहिंसक लढयांची माहिती देणारी व त्याबाबत मार्गदर्शन करणारी पुस्तके लिहीली, जी आज अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत. यांतील “१९८ मेथड्स ऑफ नॉनव्हायोलंण्ट अॅक्शन” व “फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमॉक्रसी” ही पुस्तके लोकप्रीय असून व ती पन्नासहून जास्त भाषांत उपलब्ध आहेत. १९८३ मध्ये त्यांनी “अल्बर्ट आईनस्टाईन ईन्स्टिट्यूशन” ची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश “हुकुमशाही, युद्ध, वंशसंहार व दडपशाही यांच्या विरुद्ध अहिंसक लढाईच्या वापराबद्दल संशोधन, त्याचा धोरणात्मक अभ्यास व प्रशिक्षण देणे” असून संस्थेमार्फत अनेक उपक्रम चालविले जातात. उदाहरणार्थ, संस्थेमार्फत जीन शार्प यांची अनेक पुस्तके विविध भाषांत विनामुल्य उपलब्ध करून दिलेली आहेत, पुर्वी घडून गेलेल्या अहिंसक लढायांची चिकित्सा आणि सर्वांगीण अभ्यासास प्रोत्साहन व मदत देणे आणि अशा अभ्यासांची माहिती संकलीत करून प्रसीद्ध करणे. यासोबत अहिंसक लढा देणार्‍या किंवा देऊ ईच्छिणार्‍या व्यक्ती वा गटांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संस्थेतर्फे प्रशिक्षण व मार्गदर्शन ही दिले जाते.
       शार्प यांनी स्वत: अनेक देशांतील कार्यकर्त्यांना मदत, प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले तर काही चळवळींत सामिल होऊन निदर्शनांत किंवा आंदोलनांच्या नियोजनात प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. उदा. ८० च्या दशकात म्यान्मार मधील लष्करशाही विरोधक “डेमोक्रेटिक अलायन्स” च्या स्थापनेत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, त्याबरोबरच स्थानिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, चळवळीची रणनिती ठरविणे ईत्यादी कामे त्यांनी त्यावेळेस केली. तिबेट आणि तैवान मधे चिनच्या कम्युनिस्ट सरकार विरोधी राजकीय पक्षांचे एकत्रीकरणात सहभाग आणि १९८९ मधे झालेल्या बिजींगच्या तिएन-आन-मेन चौकातील आंदोलनाच्या वेळी त्यांनी स्वत: तेथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.
       याव्यतिरिक्त त्यांनी १९९१-९२ मधे लिथुआनिया, लाटव्हिया व एस्टोनिया या देशांच्या स्वातंत्र्ययुद्धातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले, १९९८ मधे सर्बिया मधील मिलोसेव्हिच सरकार विरोधी विद्यार्थ्यांच्या चळवळीस प्रशिक्षण व मार्गदर्शन केले (ज्याची परिणती पुढे मिलोसेव्हिच सरकार कोसळण्यात झाली). २००२ मधे सद्दाम हुसैन विरोधक ईराकींना प्रशिक्षण दिले. २००३ मधे शेवर्दनात्झे विरोधी “रोझ” चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि २००३ साली युक्रेनमधील “ऑरेंज रिव्होल्युशन” साठी आणि ईराण मधील सरकार विरोधकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात जिन शार्प यांच्या अल्बर्ट आईनस्टाईन ईन्स्टिट्युशन चा प्रत्यक्ष सहभाग होता. यातील काही चळवळींना यश प्राप्त झाले तर काही चळवळीं फसल्या वा अपयशी ठरल्या आहेत, उदा. म्यान्मार, व्हेनेझुएला, झिम्बाब्वे व ईराण मधील सरकार विरोधी आंदोलने. जिन शार्प यांच्या हुकुमशाही व लष्करशाही विरोधी (अर्थातच लोकशाहीवादी) भुमिकेमुळे त्यांनी व त्यांच्या संस्थेने हुगो चावेझ, रॉबर्ट मुगाबे, महमूद अहमिदिनेजाद व म्यान्मार मधील लष्करी सरकार व ईतर अनेकांचा रोष ओढावून घेतलेला आहे.
       नुकत्याच झालेल्या ट्युनिशिया व ईजिप्त मधील उठावांत भाग घेतलेल्या काही कार्यकर्त्यांनी जिन शार्प यांच्या संस्थेत प्रशिक्षण घेतले होते, व त्यांनी जिन शार्प यांच्या पुस्तकांचा अरबीत अनुवाद करुन प्रत्यक्ष उठावाच्या वेळेस ती वितरीत केली (“१९८ मेथड्स ऑफ नॉनव्हायोलंण्ट अॅक्शन” या पुस्तकाचा मोठया प्रमाणावर वापर या उठावांत करुन घेण्यात आलेला आहे). ईजिप्त मधील क्रांतीकारकांच्या पावलावर पाउल टाकत येमेन व बहारिन मधील कार्यकर्ते अहिंसेच्या मार्गाने राज्यक्रांती करित आहेत, व यासोबत हे लोण ईतर अनेक अरब देशांत पोचलेले आहे. काही दिवसांत तेथील स्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागेल व जिन शार्प हे नाव पुन्हा पुन्हा आपल्या समोर येत राहिल.
अहिंसक लढाई -
       महात्मा गांधी नेहेमी म्हणत की “अहिंसा हे शुरांचे शस्त्र आहे” आणि त्यांची ही विचारसरणी पुढे नेत जिन शार्प राजकीय चळवळींसाठी अहिंसक मार्गांचा पुरस्कार करतात. त्यांच्या मते अहिंसक चळवळ हे दुसरे तिसरे काहीही नसून अहिंसक युद्धच आहे फक्त येथे पारंपारिक हिंसक शस्त्रांऐवजी सामाजीक, आर्थिक, मानसिक शस्त्रांचा उपयोग करुन उद्दिष्ट साध्य केले जाते. अशा अहिंसक लढाईसाठी प्रसीद्ध नेतृत्वाची गरज नसून उलट मोठा नेता अहिंसक लढाईसाठी घातक ठरायची शक्यता जास्त आहे. याकारणास्तव सामुहिक नेतृत्वावर अधिक भर दिला गेला पाहिजे व जे कार्यकर्ते या लढाईत भाग घेणार आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण मिळायला हवे. लढाईची रणनिती अतिशय विचारपुर्वक आखाली गेली पाहिजे कारण परिस्थितीचे चुकीचे आकलन झाले व त्यावर आधारित चुकिची रणनिती अवलंबली गेली तर उद्दिष्टपूर्ती होत नाही व त्याचा लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपरित परिणाम होतो. अहिंसक शस्त्रे ही पारंपारिक शस्त्रांपेक्षा अधिक परिणाम कारक असतात कारण ती केवळ शत्रुच्या युद्धसामग्रीवर घाव घालित नाही तर ती एका प्रकारे शत्रुच्या युद्धक्षमते व युद्धेच्छेवर घाव घालतात व त्यांच्या सत्तेच्या डोलार्‍यास आतुन पोखरुन टाकत सत्ता राबविणे अवघड करुन टाकतात. यामुळे शत्रूचा शक्तिपात होउन त्याच्या प्रभावाचा व सत्ता राबवण्याच्या क्षमतेचा क्षय होतो. म्हणून रणनिती आखणार्‍यांनी विरोधकांच्या बलाबलाचा फार बारकाईने अभ्यास करावा व योग्य ती शस्त्रे निवडावीत असे शार्प यांचे म्हणणे आहे.
       मानवाच्या ईतिहासात असे अनेक प्रसंग आलेले आहेत जेव्हा अहिंसक मार्गांचा वापर राजकीय वा सामाजिक बदलांसाठी कराण्यात आला होता त्यातील अलीकडच्या काळातील काही लढे व चळवळींची यादी येथे देत आहे.
हुकुमशाही विरोधी –
- १९४४ साली विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या अहिंसक चळवळीमुळे ग्वाटेमालातील जॉर्ज उबिको आणि एल-साल्वाडोर मधील मार्टिनेज या हुकुमशहांनी पलायन केले.
- १९८६ मधे फिलीपाईन्स मधील ’पित' क्रांतीमुळे मार्कोस राजवटीचा अंत झाला.
- पोलंड मधील कम्युनिस्ट राजवटी विरोधी 'सॉलिडॅरिटी' चळवळ.
- २००० मधे निवडणूक गमावलेले परंतू खुर्ची सोडण्यास नकार देणारे सर्बीयाचे अध्यक्ष मिलेसेव्हिच यांना विरोधकांच्या अहिंसक आंदोलनामुळे पराभव मान्य करुन सत्ता सोडावी लागली.
- २०११ मधे ट्युनिशिया, येमेन, जॉर्डन, ईजिप्त, बहारिन, सिरिया, अल्जेरिया येथे अहिंसक आंदोलने झाली, ट्युनिशिया व ईजिप्त मधील सत्ताधार्‍यांनी पलायन केले आहे तर ईतर ठिकाणी आंदोलने अजूनही चालू आहेत.
लष्करी उठाव विरोधी –
- १९२० मधील जर्मन कामगारांचा देशव्यापी संपामुळे ’वायमर प्रजासत्ताक’ उलथवून टाकण्यासाठी झालेले सैनिकांचे बंड अयशस्वी ठरले व बंडाच्या नेत्यांना देश सोडून पलायन करावे लागले.
- १९९१ मधे सोवियत रशिया मधे झालेले गोर्बाचेव्ह यांच्या विरुद्ध झालेले साम्यवादी पक्षाच्या नेत्यांचे बंड जनतेच्या अहिंसक आंदोलना मुळे अपयशी ठरले.
परकीय आक्रमण विरोधी –
- १९२३ मधे व्हर्सायच्या तहातील तरतुदींच्या आधारे फ्रान्सने जर्मनीच्या ताब्यातील र्‍हूर प्रांत ताब्यात घेतल्यावर स्थानीक जर्मन जनतेने अहिंसक उठाव करुन फ्रेंच सरकारला माघार घेण्यात भाग पाडले.
- १९६८ मधे झेकोस्लोव्हाकीयावर सोव्हियत रशिया व तिच्या मित्र देशांनी आक्रमण केल्यानंतर सामान्य जनतेने अहिंसक आंदोलनाद्वारे प्रतिकार केला.
- दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनांविरुद्ध डेन्मार्क, नॉर्वे, ईटली व फ्रान्स मधील जनतेने अहिंसक आंदोलनांद्वारे आपला विरोध दर्शविला होता.
वंश आधारित दडपशाही किंवा वंशवर्चस्ववादी धोरणांचा विरोध –
- १९९१ मधे रशियाच्या वंशवादी धोरणांना विरोध करण्यासाठी लिथुआनिया, लाटव्हिया व एस्टोनिया मधील जनतेने अहिंसक आंदोलने उभारली व स्वातंत्र्य मिळवीले.
मानवी हक्कांसाठी वा सामाजिक अन्यायांविरोधी –
- १९६० च्या दशकात अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या लोकांनी अहिंसक चळवळीने सरकारला नमवून अन्यायी कायदे बदलण्यास भाग पाडले.
- दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट उलथविण्यासाठी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा प्रदीर्घ लढा.

       शार्प यांनी स्वत: व अल्बर्ट आईनस्टाईन ईन्स्टिट्यूशन मार्फत अनेक ऐतिहासीक चळवळी व उठावांचा अभ्यास व विश्लेषण करुन त्यासंबंधीची प्रसीद्ध केलेली माहिती, आणि वर दिलेल्या आणि ईतर अनेक अहिंसक चळवळी व लढयांची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर (http://www.aeinstein.org) अनेक भाषांत मोफत उपलब्ध आहे. त्यांचे दुवे -
पुस्तके डाउनलोड
१९८ मेथड्स ऑफ नॉनव्हायोलंट अॅक्शन
फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमॉक्रसी

जिन शार्प यांच्या भाषणांचे व्हिडीयो –





अहिंसक लढयांविषयी अधिक माहिती येथे पहा -
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolence
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolent_revolution
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolent_resistance

       या पोस्टच्या शेवटी जिन शार्प यांच्या “फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमॉक्रसी” पुस्तकातील मला आवडलेली काही वाक्ये देत आहे
"Violent rebellions can trigger brutal repression that frequently leaves the populace more helpless than before."
By placing confidence in violent means, one has chosen the very type of struggle with which the oppressors nearly always have superiority.

If the guerrillas should finally succeed, the resulting new regime is often more dictatorial than its predecessor due to the centralizing impact of the expanded military forces and the weakening or destruction of the society’s independent groups and institutions during the struggle — bodies that are vital in establishing and maintaining a democratic society.

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी मराठीत लिहीण्यासाठी खालील बॉक्स मधे टाईप करा व नंतर ते वर चिकटवा


Related Posts Plugin for WordPress, Blogger...