पुण्यातील संग्रहालये

       मी कामानिमीत्त अनेक शहरांत राहिलोय, किंवा भेट दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी गेलो की प्रेक्षणीय स्थळे, वस्तुसंग्रहालये पहायला जाणे हे कार्यक्रम ठरलेले असायचे. बहुतेक शहरांतील स्थळांची व संग्रहालयांची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होते, पण मी जेव्हा पुण्यातील संग्रहालयांची माहिती इंटरनेटवर शोधायचा प्रयत्न केला तेव्हा फारशी माहिती मिळाली नाही. म्हणून या पोस्टमधे पुण्यातील संग्रहालयांची माहिती देत आहे. याचा उद्देश वाचकांना कोणकोणती संग्रहालये आहेत व ती कोठे आहेत ही माहिती देणे हा आहे. वेळेचा अभाव व विस्तारभयास्तव संग्रहालयातील वस्तूंबद्दल अधीक माहिती या पोस्ट मधे दिलेली नाही.
       यातील काही संग्रहालयांना भेट देउन बरीच वर्षे झालेली आहेत, त्यामूळे कदाचित संग्रहालयांचे पत्ते व स्वरुप बदललेले असण्याची शक्यता आहे. तेव्हा जर काही बदल आढळला तर प्रतिक्रियांमार्फत जरुर कळवा.

१. महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (विकीमॅपिया) - पुण्यातील पहिले वस्तुसंग्रहालय, पुर्वीचे लॉर्ड रे म्युझीयम. विशेष - शेतीची आणि कारखान्यातील आयुधे व यंत्रे,प्राण्यांच्या प्रतिकृती.
२. राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय (विकीमॅपिया) - पुण्यातले सर्वांत प्रसिद्ध संग्रहालय. दिनकर केळकर यांनी मोठया कष्टाने जमा केलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू येथे पहायला मिळतील.
विशेष - मस्तानी महाल, विवीध प्रकारची वाद्ये आणि दिवे.
३. भारत इतिहास संशोधन मंडळ (विकीमॅपिया) - जुनी कागद्पत्रे आणि हस्तलिखिते येथे ठेवलेली आहेत.
४. डॉ. सांकलीया संग्रहालय (विकीमॅपिया) - प्रागैतिहासीक काळातील मानवाच्या जीवनाची ओळख करुन देणारे संग्रहालय.
५. मराठा इतिहास संग्रहालय (विकीमॅपिया) - १७ व्या आणि १८ व्या शतकातील वस्तूंचे संग्रहालय. युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे, नकाशे आणि ऐतिहासिक पत्रे येथे बघायला मिळतील.
६. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र संग्रहालय (विकीमॅपिया) - मी पाहिलेल्या संग्रहालयांपैकी सर्वात लहान. येथे जुनी दुर्मीळ हस्तलिखिते प्रदर्शनार्थ ठेवली आहेत.
विशेष - खगोलशास्त्रीय वेधांसाठी वापरला जाणारा अ‍ॅस्ट्रोलोब येथे पहायला मिळेल.
७. आदिवासी संशोधन संस्थेचे संग्रहालय (विकीमॅपिया) - महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींची माहिती येथे पहायला मिळेलत. त्यांचे कपडे, दागिने, वाद्ये, रोजच्या वापरातील वस्तू येथे ठेवल्या आहेत.
विशेष - येथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वाद्यांचे आवाजही ऐकता येतात आणि जगप्रसिद्ध वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांनी काढ्लेली चित्रे पाहता येतील.
८. लाल महाल (विकीमॅपिया) - शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील निवडक घटनांवरील चित्रे येथे पहायला मिळतात.
९. पेशवे संग्रहालय (विकीमॅपिया) - पेशवेकालीन वस्तूंचे संग्रहालय.
१०. विश्रामबागवाडा संग्रहालय (विकीमॅपिया) - पुणे शहराचा विकास कसा झाला हे दाखविणारे पुनवडी ते पुणे प्रदर्शन सोबत जुनी हत्यारे येथे पाहता येतील.
११. आगा खान पॅलेस (विकीमॅपिया) - महात्मा गांधी यांना १९४२ मधे येथे स्थानबद्ध करून ठेवले होते. सध्या इथे गांधी मेमोरीयल सोसायटी संचलीत महात्मा गांधी संग्रहालय आहे. स्थानबद्धतेच्या काळातील महात्मा गांधी यांच्या वापरातील वस्तू इथे ठेवण्यात आल्या आहेत.
१२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय (विकीमॅपिया) - आंबेडकरांच्या वापरातील वस्तु आणि काही दुर्मीळ फोटो येथे बघता येतील.
१३. लोकमान्य टिळक वस्तुसंग्रहालय (विकीमॅपिया) - लोकमान्य टिळकांच्या वापरातील वस्तु, केसरी चे जूने अंक येथे ठेवले आहेत.
१४. जोशींचे रेल्वे संग्रहालय (विकीमॅपिया) - येथे रेल्वे इंजिन, डबे, बोगदे, प्लॅटफॉर्म यांच्या छोट्या प्रतिकृती मांडलेल्या आहेत.
१५. एन डी ए संग्रहालय (विकीमॅपिया) - तिन्ही संरक्षणदलांचे एकत्रित संग्रहालय.
१६. इरावती कर्वे मानववंशशास्त्रीय संग्रहालय (विकीमॅपिया) - मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास येथे पहायला मिळतो.
१७. सैन्य अभियांत्रीकी कॉलेज (CME) संग्रहालय (विकीमॅपिया) - सैन्यास लागणारी यंत्रसामग्री आणि विवीध दळणवळणाची साधने येथे पहायला मिळतील.
१८. वैदिक संशोधन संस्थेचे संग्रहालय (विकीमॅपिया) - वैदिक काळात यज्ञविधी करिता वापरली जाणारी साधने या संग्रहालयात ठेवलेली आहेत.
१९. संधीपाद संग्रहालय (Arthropoda Museum) (विकीमॅपिया) - या संग्रहालयात अनेक संधीपाद प्राणी प्रदर्शनार्थ ठेवलेले आहेत, यात विवीध किटक, खेकडे आणि इतर प्रकारच्या संधीपाद प्राण्यांची माहिती मांडली आहे. सध्या हा संग्रह प्राणिशास्त्र विभाग, फर्ग्युसन कॉलेज यांच्याकडे आहे.

       खाली दिलेल्या संग्रहालयांना मी अजुनपर्यंत भेट दिलेली नाही, पण त्यांच्या विषयी ऐकले किंवा वाचले आहे. वाचकांपैकी कुणाकडे जर या संग्रहालयांविषयी माहिती असेल तर प्रतिक्रीयांमार्फत कळवा.

२०. प्रभात संग्रहालय (विकीमॅपिया)
२१. इंद्रधनुष्य, मुलांचे संग्रहालय - दत्तवाडी
२२. कॅमेरा संग्रहालय - कोंढवा
२३. कर्वे स्मारक संग्रहालय - कर्वेनगर

सुचना -
       संग्रहालयाचा पता देण्याऐवजी विकीमॅपिया ची लिंक दिलेली आहे, यामुळे नेमके ठिकाण शोधण्यास मदत होईल. तुम्हाला ज्या संग्रहालयास भेट द्यायची आहे त्याच्या समोरील "विकीमॅपिया" शब्दावर क्लिक केल्यास विकीमॅपिया चा ऑब्जेक्ट सॅटेलाइट मॅप, छोट्या आकारात दिसेल. या मॅपच्या वर आणि उजव्या बाजुला वरच्या कोपर्‍यात WikiMapia लोगो दिसेल, त्यावर क्लिक केल्यास सॅटेलाइट मॅप मोठया आकारात दिसेल.

भारतातील आधुनिक खगोलशास्त्राचे जनक

       मी आकाशनिरीक्षणाला सुरुवात केली त्यावेळी एका गोष्टीचे आश्चर्य वाटायचे की नक्षत्रांची भारतीय नावे आणि पाश्चात्य नावे यांत एवढे साम्य का आहे? कित्येक नक्षत्रांची भारतीय नावे ही पाश्चात्य नावांची भाषांतरे आहेत आणि प्राचीन भारतीय खगोलविदांनी केवळ २७ नक्षत्रांना व १२ राशींना नावे दिलेली होती. म्हणजे ३९ नक्षत्रांना मुळ भारतीय नावे आहेत आणि उर्वरित ४९ नक्षत्रांची नावे ही नंतर कोणितरी सुचविली आहेत? पण या ४९ पैकी काही नक्षत्रांची नावे ही पौराणिक कथांमधील असून (देवयानी - Andromeda, ययाती - Perseus) त्यांचा पाश्चात्य नावांशी काहिही संबंध नाही तर काही नावे वस्तूंची आहेत (चषक - Crater, दूरदर्षी - Telescopium) आणि काही नावे ही प्राण्यांची (शशक - Lepus) आणि काही नावे नक्षत्रांच्या आकारानूसार (त्रिकोण - Triangulum) दिलेली आहेत. याचा अर्थ असा होतो की, या पाश्चात्य नावांचे भारतियीकरण केले गेले आहे, पण ते कोणि केले? त्यांनी नेमके कोणते निकष वापरले? याचा शोध घेण्याचा मी बराच प्रयत्न केला, अनेकांशी बोललो, काही पुस्तके वाचली पण माहीती मिळत नव्हती आणि हे प्रश्न तसेच अनुत्तरीत राहिले.

       काही वर्षांनंतर माझ्या वाचनात बाळशास्त्री जांभेकर (१८१०-१८४६) यांचे लेख आले, आपण त्यांना "दर्पण" वृत्तपत्राचे संपादक आणि समाजसुधारक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध विषयांचे अध्ययन, अध्यापन व त्यांवर लेखन आहे, उदाहरणा दाखल सांगायचे झाले तर इतिहास, भुगोल, गणित. त्यांच्या खगोलशास्त्रातील कार्याविषयी माहिती आणि त्यांनी भारतात आधुनिक खगोलशास्त्राचा पाया घातला याची माहिती करून देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.

       जांभेकरांनी खगोलशास्त्र विषयक लेख दिग्दर्शन मासिकाच्या अंकांत प्रसिध्द करायला १८४१ मधे सुरुवात केली, या लेखांसोबत नक्षत्रांची रेखा चित्रे, आणि मराठीतील पहिला आकाशाचा नकाशा (दोन भागांत - उत्तरार्ध आणि दक्षिणार्ध) प्रसिद्ध केला, या नकाशांत दॄष्यप्रत ५ पर्यंतचे तारे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या लेखांमधे त्यांनी अनेक खगोलशास्त्रीय संज्ञा व संकल्पना सोप्या भाषेत सांगितल्या आहेत, उदा. क्रांति (declination), विषुवांश (Right ascension) आणि नक्षत्रांचे उदयास्तकालाचे कोष्टक देखील दिलेले आहे. लेखमालेतील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी सुचविलेली नक्षत्रांची मराठी नावे हा आहे. प्राचीन भारतीय खगोलविदांनी केवळ २७ नक्षत्रांना व १२ राशींना नावे दिलेली आहेत, पण खगोलनिरिक्षकांना विशिष्ट मर्यादे पलिकडे त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण या नक्षत्रांच्या मर्यादा उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशा आहेत. त्यामूळे निरिक्षण करावयाच्या तार्‍याचे स्थान निश्चित करणे फार अवघड होते. यावर उपाय म्हणून जांभेकरांनी पाश्चात्यांनी आकाशाचे भाग पाडून केलेली नक्षत्रे स्विकारली व त्यांना मराठी नावे सुचविली. हि नावे सुचविताना त्यांनी काही नावांचे भाषांतर केले तर काही ठिकाणी नवीन नावे सुचविली आहेत.
या नावांसाठीचे निकष त्यांच्याच शब्दांत, "नक्षत्रांस नावे मराठीत देतेवेळेस प्रसिद्ध पशूंची किंवा यंत्रादिकांची जी नावें तीं भाषांतर करुन तशीच ठेविली आहेत. ग्रीक लोकांच्या प्राचीन कथांतील देवतांची नावे फिरवून हिंदू लोकांच्या पुराणांत त्याप्रकारचे कांही कथासंदर्भ जे मिळाले, त्यांस अनुसरून देवदेवतांच्या संज्ञा केल्या आहेत. हिंदूमध्ये प्रसिद्ध ज्या राशी आणि नक्षत्रें त्यांची नावे न फिरवितां तशीच राखिली आहेत".

नक्षत्रांच्या नावांची काही उदाहरणे –

देवयानी - आंद्रोमीदा. ही सिफियस यपासून क्यासिओपिया हिची कन्या. हीच्या आईने सौंदर्याचा गर्व केल्यामुळे समुद्राच्या देवतेचा कोप झाला, तो शांत करण्यासाठी आईबापांनी समुद्रांत सोडून दिली, तेथून पुढें पर्सियस राजाने हिला (समुद्रातून) काढून तिच्याशी लग्न केले, अशी कथा आहे. या कथेसारखेंच देवयानीचे चरित्र पुराणांत वर्णिले आहे, म्हणोन या नक्षत्रास हे नाव दिलें आहे.
ययाति - पर्सियस. हा आंद्रोमीदेचा नवरा. याणें मिडुसा हा राक्षस मारला, त्याचें शीर या नक्षत्रांत काढले असतें.
हंस - सिग्नस, म्हणजे हंस. ज्युपिटर देवानें कोणे समयी हंसाचे रुप धारण केलें होतें, त्यावरुन याचे नाव पडलें.
शशक - लीपस, म्हणजे ससा.
सूक्ष्मदर्शी - मायक्रॉसकोपियम्. लहान पदार्थ मोठे दिसण्याचे यंत्र.

भारतातील आधुनिक खगोलशास्त्राचे जनक

       पुर्वी जगभर फलज्योतिष आणि खगोलशास्त्रात फरक केला जात नसे, दोन्हींचे अध्ययन व अध्यापन एकत्रच चालायचे. युरोप मधे १६ व्या शतकाच्या मध्यास वैज्ञानिक क्रांतीस (Scientific Revolution) सुरुवात झाली आणि फलज्योतिष आणि खगोलशास्त्राचे मार्ग वेगळे झाले, मात्र भारतात यासाठी बराच काळ जावा लागला. १९ व्या शतकात ईंग्रजांनी भारतात पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणास सुरूवात केली आणि त्या मार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होऊ लागला. सुरवातीच्या काळात ईंग्रजीचे शिक्षण घेणार्‍या काही भारतीयांनी पाश्चात्य ज्ञान एतद्देशीय भाषांत आणले आणि भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व विज्ञानाचा पाया घातला, यांत बाळशास्त्री जांभेकरांचे नाव अग्रभागी घेतले जाते.

बाळशास्त्री जांभेकर यांचे भारतातील खगोलशास्त्रास योगदान –
१. नक्षत्रांचे भारतीय नामकरण (भारतीयीकरण).
२. आकाशाचा नकाशा पहिल्यांदा भारतीय भाषेत तयार करवून घेतला आणि प्रसिद्ध केला.
३. नक्षत्रांची चित्रे (आकृती) पहिल्यांदा भारतीय भाषेत तयार करवून घेतली आणि प्रसिद्ध केली.
४. खगोलशास्त्रातल्या संज्ञा व संकल्पनांचे स्पष्टिकरण सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असे लिहून प्रसिद्ध केले.
५. उदयास्त काल निश्चिती कशी करावी यावर लिखाण व त्या साठी लागणारी कोष्टके तयार केली.
६. दिग्दर्शन मासिकातील एका उल्लेखानूसार त्यांनी तार्‍यांचा गोल (Star globe) बनविण्याचे ठरविले होते, परंतू आज या गोलाविषयी कोणतीही अधीक माहिती उपलब्ध नाही.

जांभेकरांपूर्वी किंवा समकालीन खगोलशास्त्रज्ञ भारतात नव्हते का?

       आधुनिक खगोलशास्त्र भारतात आणण्याचे श्रेय पाश्चात्यांना जाते, फ्रेंच व इंग्लिश खगोलशास्त्रज्ञांनी १७ व्या आणि १८ व्या शतकात भारतातून ग्रहणांची व तार्‍यांची निरीक्षणे केली, परंतु त्यात भारतियांचा सहभाग नव्हता. (संदर्भ)

मद्रास वेधशाळा (Madras Observatory) - ईस्ट इंडीया कंपनीने १७८६ मध्ये मद्रास येथे वेधशाळेची स्थापना केली. या वेधशाळेत अनेक इंग्रज खगोलशास्त्रज्ञ कार्यरत होते, मात्र सुरुवातीच्या काळात भारतीयांची खगोलशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झालेली आढळत नाही. मद्रास वेधशाळेत भारतीयाने केलेल्या पहील्या निरीक्षणांची नोंद सी. रघूनाथचारी यांची आहे, त्यांना १८६७ मध्ये रुपविकारी तार्‍याच्या शोधाचे श्रेय दिले जाते. (संदर्भ १, संदर्भ २)

महाराज सवाई जयसिंह - यांनी १७२४ ते १७३५ या काळात उत्तर भारतात ५ शहरांत वेधशाळा बांधल्या. पण यामागचा त्यांचा उद्देश मात्र वेधांत अचुकता यावी व त्यामूळे शुभ काल आणि अशुभ काल याचे अचूक निदान होईल हा होता. या वेधशाळांचा उपयोग फलज्योतिषासाठी करण्यात आला म्हणून महाराज सवाई जयसिंह व त्यांच्या वेधशाळेतील ज्योतिषांना आधुनिक खगोलशास्त्रज्ञ म्हणता येणार नाही. (संदर्भ १संदर्भ २)

       बाळशास्त्री जांभेकरांनी खगोलशास्त्राची माहिती व प्रसार व्हावा म्हणून अनेक लेख लिहीले, आकाशाचे नकाशे आणि नक्षत्रांची चित्रे बनविली, आकाशनिरिक्षणास आवश्यक कोष्टके तयार केली, नक्षत्रनामांचे भारतीयीकरण केले आणि भारतात आधुनिक खगोलशास्त्राचा पाया घातला. या माहिती आधारे निश्चितपणे असे म्हणता येईल की बाळशास्त्री जांभेकर हे भारतातील आधुनिक खगोलशास्त्राचे जनक आहेत.

संदर्भग्रंथ - Memoirs and Writings of Acharya Balshastri Jambhekar Vol 1, Vol 2 and Vol 3.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...