महात्मा गांधीं विषयीचे काही गैरसमज

       गेले दोन-अडिच वर्षे मी इंटरनेट वर कित्येक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील फोरम्स व ब्लॉग्सचे वाचन करत आहे, या फोरम्स पैकी अनेक चर्चांमधे व ब्लॉग पोस्टस् वर महात्मा गांधींचा व त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वांचा उल्लेख येतो आणि अशावेळी काहीजण गांधींवर चुकीचे आरोप करतात किंवा चुकीची माहिती देतात. याप्रकारे महात्मा गांधीं विषयी पसरविले जाणारे गैरसमज सर्वसाधारणपणे खालील प्रकारचे असतात.

१. महात्मा गांधींनी लिहिलेली वाक्ये वेगळी काढून, मुळ लेखातील अन्य वाक्यांच्या संदर्भा शिवाय दिली जातात.
२. गांधींच्या संपुर्ण लेखाच्या आशया कडे दुर्लक्ष करुन एखाद्या वाक्याच्या सहाय्याने "गांधींना असे म्हणायचे आहे" असा चुकीचा व दिशाभुल करणारा निष्कर्ष काढला जातो.
३. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा सोयिस्कर अर्थ लावला जातो.
४. मुळ वस्तुस्थिती कडे कानाडोळा करुन गांधींनी असे करायला हवे होते किंवा करायला नको होते याप्रकारची विधाने केली जातात.

       या प्रकारच्या अपप्रचारास जमेल तेव्हा व शक्य असेल त्या प्रकारे उत्तर देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आणि महात्मा गांधींविषयीचे काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण व त्यासंबधीत योग्य संदर्भ वाचकांस देणे हा या पोस्टचा उद्देश आहे. या पोस्टमधील सर्व संदर्भ इंग्रजीत आहेत आणि मी त्यांचे भाषांतर मराठीत करणार होतो. पण एकतर मला मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांत विशेष गती नाही आणि महात्मा गांधींचे लिखाण थोडे वकिली थाटाचे आहे. त्यामुळे माझ्या भाषांतरातून अर्थाचा अनर्थ होईल म्हणून सर्व संदर्भांसाठी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या मुळ लेखांच्या लिंक दिलेल्या आहेत.

१. भगतसिंग व त्यांच्या अनुयायांच्या मृत्यूस महात्मा गांधीं अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहेत.
- या विषयावरचा एक लेख येथे वाचा. http://www.gandhiserve.org/news/mgnd/news200609250930.html#a6
२. महात्मा गांधींच्या मते शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह आणि राणा प्रताप हे वाट चुकलेले देशभक्त आहेत.
- या लिंक वर महात्मा गांधींचा मुळ लेख दिलेला आहे, न चुकता संपुर्ण लेख वाचा. http://appliedgandhi.blogspot.com/2007/11/my-friend-revolutionary.html
महात्मा गांधींचे क्रांतिकारकांविषयीचे मत जाणुन घेण्यासाठी हे दोन लेख ही वाचा. http://appliedgandhi.blogspot.com/2008/06/to-revolutionary-in-making.html आणि http://appliedgandhi.blogspot.com/2008/06/revolutionary-at-it-again.html
३. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण केले.
- या संबधातली वस्तुस्थिती येथे वाचा. http://www.mkgandhi-sarvodaya.org/faq/q3.htm
४. महात्मा गांधी पाकिस्तानच्या निर्मीतीस कारणीभूत आहेत.
- या विषयी स्पष्टीकरण येथे वाचा. http://www.mkgandhi-sarvodaya.org/faq/q2.htm
५. गांधीजींनी मुसलमानांचा अनुनय केला.
- हिंदू-मुसलमान संबंधाविषयी गांधींचा मुळ लेख येथे वाचा.
http://appliedgandhi.blogspot.com/2007/12/mahatma-gandhi-on-hindu-muslim-issues.html
६. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना द्वेषपुर्ण वागणुक दिली.
- या दोघांतील संबंधावर प्रकाश टाकणारा लेख येथे वाचा. http://orissagov.nic.in/e-magazine/Orissareview/jan2005/englishPdf/Gandhi_subhas.pdf
७. महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्त्वाविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे, अहिंसेविषयी गांधीनी लिहिलेले काही लेख येथे वाचता येतील. http://appliedgandhi.blogspot.com/2008/03/understanding-gandhian-ideal-of-non.html
http://appliedgandhi.blogspot.com/2008/03/understanding-gandhian-ideal-of-non_20.html
http://www.gandhi-manibhavan.org/gandhiphilosophy/philosophy_nonviolence_nonviolence.htm

       अहिंसेविषयी अधीक माहितीसाठी हे लेख वाचा.
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolence
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolent_revolution
http://en.wikipedia.org/wiki/Nonviolent_resistance

       महात्मा गांधीविषयी अधिक माहिती या वेबसाईटस वर मिळेल.
http://www.gandhiserve.org/
http://www.mkgandhi-sarvodaya.org/
http://www.gandhi-manibhavan.org
http://www.gandhitopia.org/
http://www.mahatma.com/
http://www.gandhianpeace.com/
http://www.mkgandhi.org/
http://appliedgandhi.blogspot.com

महात्मा गांधीवर काही लेख.
डॉ. अभय बंग यांचा लेख - http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Meeting_the_Mahatma.pdf
महाराष्ट्र टाइम्स मधील सतीश कामत यांचा लेख - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2747133.cms

मेसिए मॅराथॉन

       दरवर्षी दसर्‍यानंतर आणि दिवाळी नंतर आकाशनिरिक्षकांची लगबग सुरु होते, दुर्बिणी साफसूफ करणे, नकाशे गोळा करणे, लघुग्रहांची, उल्कावर्षावांची माहिती काढून येणार्‍या सहा महिन्यांचा कार्यक्रम तयार व्हायला लागतो. सगळेजण पाउस थांबून आकाश निरभ्र होण्याची आणि अमावस्येची वाट पहात असतात. आज सोमवार १६ नोव्हेंबर, आकाशनिरिक्षणाच्या २००९-२०१० च्या हंगामातील पहिली अमावस्या आहे आणि १७ व १८ तारखेला सिंह तारकासमूहातील उल्कावर्षाव आहे. अमावस्येनंतर लगेच होणारा उल्कावर्षाव असल्याकारणाने भरपूर उल्का दिसतील असे वाटते. जर तुम्ही या हंगामात सिंह तारकासमुहातला, क्वाड्रंटिड्स आणि कुंभ तारकासमुहातल्या उल्कावर्षावाचे निरिक्षण, जानेवारीतील कंकणाकृती सर्यग्रहण पाहणे आणि दर महिन्याच्या अमावस्येच्या सुमारास आकाशनिरिक्षण असा कार्यक्रम ठरवला असेल तर त्यात मेसिए मॅराथॉनचा देखिल समावेश जरुर करावा.
       दुर्दैवाने मेसिए मॅराथॉनच्या तयारी विषयी जी माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे ती पुरेशी नाही, म्हणून आवश्यक ती माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
       १८ व्या शतकातील फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ "शार्ले मेसिए" ने नवीन धुमकेतू शोधत असताना दिसलेल्या खगोलीय वस्तूंची एक यादी बनवली, ही यादी "मेसिए कॅटलॉग" नावाने प्रसिद्ध आहे. या यादीत एकुण १०९ खगोलीय वस्तूंची नोंद आहे (संदर्भ). या सर्व खगोलीय वस्तूंना एका रात्रीत पाहण्याचा प्रयत्न करण्यास "मेसिए मॅराथॉन" असे संबोधले जाते.
       जर तुम्ही आकाशाचा नकाशा निट पाहिलात तर एक गोष्ट लक्षात येते की विषुवांष (Right Ascensions) २२.०० ते २४.०० मधील आकाशात फक्त मे-५२ ही एकच खगोलीय वस्तू आहे. जेव्हा सुर्य या विषुवांषांमधे असेल तेव्हा जास्तीत जास्त मेसिए खगोलीय वस्तू रात्री आकाशात दिसतील. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवडा ते एप्रिल महिन्याच्या पहिला आठवडा सुर्य आकाशाच्या या भागात असतो, म्हणून मेसिए मॅराथॉन मार्च महिन्याच्या उत्तरार्धात किंवा एप्रिल महिन्याच्या पुर्वार्धात केली जाते. मार्च २०१० मधील अमावस्या १५ तारखेला आहे म्हणून १४, १५ व १६ मार्च च्या रात्री मेसिए मॅराथॉन साठी अनुकूल आहेत.
       माझ्या मते मेसिए मॅराथॉन मधे आकाशनिरिक्षकाची लढाई वेळेशी आहे, आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मेसिए खगोलीय वस्तू पाहणे हे उद्दिष्ट असते. जेव्हा वेळेशी लढाई असते तेव्हा यशासाठी अचूक नियोजन हे असलेच पाहिजे. वर लिहिल्याप्रमाणे मेसिए मॅराथॉन विषयी इंटरनेट वर जी माहिती उपलब्ध आहे ती कमी आहे आणि जी काही थोडी माहिती आहे तिचे स्वरुप बरेचसे तांत्रीक आहे व दुर्दैवाने त्यात वेळेचे नियोजन आणि काय करावे अथवा टाळावे याबाबत आवश्यक माहिती जवळजवळ नाही.

मेसिए मॅराथॉनची तयारी कशी करावी?
       मेसिए मॅराथॉन साठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्बीण, मेसिए मॅराथॉनमधे मिळणारे यश (किती मेसिए खगोलीय वस्तू पाहिल्या याचा आकडा) हे त्यासाठी वापरलेल्या दुर्बीणवर अवलंबुन आहे, जर दुर्बीणीचा व्यास जास्त असेल तर अंधुक खगोलीय वस्तू दिसण्याची शक्यता वाढ्ते. पण याचा अर्थ असा नाही कि खुप मोठी दुर्बीण वापरायला हवी, कारण जेवढी दुर्बीण मोठी, तेवढी ती अवजड आणि हाताळायला अवघड जाते. साधारणपणे ३ ते ६ ईंच व्यासाची दुर्बीण वापरली तरी चालेल. पण याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा व निवड करताना सहज उपलब्ध आणि सुलभपणे हाताळता येईल अशी दुर्बीण निवडावी. कमी व्यासाची दुर्बीण वापरली तर आकडा कमी होतो आणि मोठया व्यासाची दुर्बीण वापरली तर ती हाताळणे अवघड व त्यातच थोडा वेळ वाया जातो, यातला सुवर्णमध्य काढणे ज्याचा त्याने आपापल्या वकुबाप्रमाणे आणि दुर्बीणीच्या उपलब्धते नुसार करणे योग्य ठरेल.
       काही आकाशनिरिक्षक स्वयंचलीत (GoTo) दुर्बीण वापरतात कारण तिच्या सहाय्याने खगोलीय वस्तू शोधणे सोपे जाते. फक्त खगोलीय वस्तूचे विषुवांष (R.A.) व क्रांती (Dec.) दुर्बीणीच्या नियंत्रकात भरा आणि दुर्बीण स्वतः खगोलीय वस्तू शोधते. याप्रकारच्या दुर्बीणींना आधी ध्रुवरेषेशी समांतर लावावे लागते आणि त्यासाठी थोडावेळ वाया जातो, पण खगोलीय वस्तू शोधायला कमी वेळ लागत असल्याने मॅराथॉनच्या शेवटी आकडा वाढतो (आणि तेच महत्त्वाचे). परंतु अशाप्रकारच्या दुर्बीणी महाग असुन सहज उपलब्ध होत नाही म्हणून या पोस्टमधे अशा दुर्बीणींचा विचार यापुढे केलेला नाही.
       रिफ्लेक्टर किंवा रिफ्रॅक्टर जी दुर्बीण उपलब्ध असेल ती वापरावी फारसा फरक पडणार नाही.
       दुर्बीणीला व्ह्यु-फाईंडर असावा व तो दुर्बीणीला समांतर अचुकपणे लावलेला असला पाहिजे आणि व्ह्यु-फाईंडरच्या आयपिसला क्रॉस-वायर असलीच पाहिजे.
       दुर्बीणीचे आयपिस हे कमी मॅग्निफिकेशनचे असतील तर उत्तम, कारण जर मॅग्निफिकेशन कमी असेल तर जास्त आकाश दिसते आणि खगोलीय वस्तू शोधणे सोपे जाते.
       जर तुम्ही आकाशाचा नकाशा वापरुन आणि विषुवांष व क्रांती च्या सहाय्याने खगोलीय वस्तू शोधणार असाल तर दुर्बीणीचे माउंट इक्वेटोरियल असले तर चालेल, कारण या माउंटची दुर्बीण ध्रुवरेषेशी समांतर अशी लावलेली असल्याने दुर्बीणीचे क्रांती स्थिर ठेउन आणि विषुवांष बदलुन खगोलीय वस्तू शोधणे सोपे जाते. पण जर का तुम्ही आधी तयार केलेल्या आकृत्या वापरणार असाल तर मात्र अशी दुर्बीण वर-खाली व डावीकडे-उजवीकडे वळवणे, फिरवणे फार अवघड जाते, या परिस्थितीत अल्ट-अझिम्युथ किंवा डॉब्सोनियन माउंटची दुर्बीण वापरणे योग्य. मी मात्र अल्ट-अझिम्युथ माउंट वापरायची शिफारस करेन कारण डॉब्सोनियन माउंट जड आणि आकाराने मोठे असल्याकारणाने हाताळणे थोडे अवघड जाते.
       खगोलीय वस्तू शोधण्यासाठी विल्-टिरीऑन चा Sky Atlas 2000 हा नकाशा वापरावा, आणि सर्व मेसिए खगोलीय वस्तूंची विषुवांष (R.A.) व क्रांती (Dec.) सह यादी असणे आवश्यक आहे.

नियोजन व सराव अत्यंत आवश्यक आहे!
       मेसिए मॅराथॉन साठी योग्य तारिख १५ मार्च आहे म्हणजे आज पासून ३ महिने, म्हणजेच ३ अमावस्या व त्यांच्या आधीची व नंतरची रात्र पकडली तर एकुण ९ रात्री सरावासाठी मिळतात आणि त्या पुरेशा आहेत. सरावास सुरुवात करण्याआधी प्रथम आकाशाचा नकाशा मिळवा, मेसिए मॅराथॉन साठी जी दुर्बीण मार्च मधे वापरणार आहात ती तयार करुन ठेवा (शेवट पर्यंत त्याच दुर्बीणीचा वापर सरावासाठी व प्रत्यक्ष मॅराथॉनसाठी करावा) आणि मेसिए वस्तूंची यादी घेउन ती क्रमवार (क्रमांका नुसार नाही, तर पाहण्याच्या वा शोधण्याच्या क्रमानुसार) तयार करावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतः काढ्लेल्या तारकासमुहांच्या आकृत्यांची वही तयार हवी. या वहीत मेसिए वस्तूंना शोधण्यासाठी आकाशाच्या त्याभागाचा छोटा नकाशा काढुन जवळच्या तेजस्वी आणि सहज सापडेल अशा तार्‍यां पासुन मेसिए वस्तू पर्यंत दुर्बीणीतुन जे दिसतात ते तारे व त्यांच्या समुहांचे आकार काढावेत, आणि मेसिए वस्तूंना शोधण्याचा सोप्यात सोप्या मार्गाची आकृती तयार करावी.
       अशा आकृतीचे एक उदाहरण म्हणून http://www.messiermarathon.com या वेबसाईट वरचे "मेसिए मॅराथॉन लॉग" चे चित्र पहा, या चित्राच्या खालच्या भागात अशीच एक आकृती काढलेली आहे.
विषेश सुचना -
       वर दिल्याप्रमाणे आधी काढलेल्या आकृत्या वापरुन मेसिए वस्तू शोधायचा प्रयत्न करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तारकासमुह पुर्वेस उगवुन पश्चिमेस मावळताना १८० अंशात फिरतात.
उदा. - पुर्वेस उगवताना मृग तारकासमुहातील मधले तीन तारे वरुन खाली मिंटाक, अलनिलम, अलनिटाक याक्रमाने दिसतात. परंतु पश्चिमेस मावळताना १८० अंशात फिरुन वरुन खाली अलनिटाक, अलनिलम, मिंटाक याक्रमाने दिसतात. म्हणजेच वरचे खाली व डाव्याचे उजवे होते, आकृत्या काढताना व वापरताना हे लक्षात ठेवा.
सोप्यात सोप्या मार्गाचे एक उदाहरण -
       जर मे-३३ शोधायचा असेल तर ट्रायँग्युलम मधील "मेटाला" व देवयानी (Andromeda) तील "मिराक" या दोन्ही तार्‍यांना आधी शोधून त्यांच्या नजीकच्या तार्‍यांच्या सहाय्याने मे-३३ शोधता येते. मेटाला ते मे-३३ हे अंतर जवळजवळ ४ अंश आहे तर मिराक ते मे-३३ हे अंतर जवळजवळ ७ अंश आहे. अशावेळी बहुतेक आकाशनिरिक्षक आधी मेटाला वर दुर्बीण रोखतात व त्याच्या सहाय्याने मे-३३ शोधायचा प्रयत्न करतात. पण माझ्या मते आधी मे-३१ (देवयानी आकाशगंगा), मे-३२ आणि मे-११० पाहिल्या नंतर मिराक वर येउन मे-३३ शोधणे अधिक सोपे जाते, कारण मेटाला ते मे-३३ मधील आकाशापेक्षा, मिराक ते मे-३३ मधील आकाशात दुर्बीणीतुन दिसणार्‍या तार्‍यांची संख्या जास्त आहे. आणि देवयानी तारकासमुहावरुन दुर्बीण काढून ट्रायँग्युलम वर रोखण्यात जाणारा वेळ देखील वाचतो.
       याप्रमाणे सर्व मेसिए वस्तूं पर्यंत पोचण्याचा जलद व सोपा मार्ग शोधुन त्याच्या आकृत्या तयार कराव्यात, त्यामुळे प्रत्यक्ष मॅराथॉनच्या वेळेस गडबड गोंधळ होणार नाही.
       मेसिए मॅराथॉन करताना कोणत्याही कारणास्तव वेळ वाया घालवून चालणार नाही. काही मेसिए वस्तू नुसत्या डोळ्यांनी दिसतात त्याच्यावर दुर्बीण रोखण्यात काहिच हशील नाही. उदा. मे-६, मे-७ (दोन्ही वृश्चिक तारकासमुह), मे-३१ (देवयानी आकाशगंगा), मे-४२ (मृग तारकासमुह), मे-४४ (कर्क तारकासमुहातील मधाचे पोळे) आणि इतर काही मेसिए वस्तू दुर्बीणीतून पाहण्यात वेळ घालवू नये, या मेसिए वस्तूंकडे दुर्बीणी शिवाय पहा आणि दिसल्या की लगेच पाहिल्याची नोंद यादी मधे करुन पुढच्या मेसिए वस्तू शोधायला सुरुवात करा. मेसिए वस्तू दुर्बीणीतुन किती छान दिसतात ते पहाणे, व त्यांचा आस्वाद घेणे हे मेसिए मॅराथॉन नंतर देखील करता येईल.
       १४, १५ व १६ मार्च २०१० या तीन रात्री मेसिए मॅराथॉन साठी योग्य आहेत. तीन दिवस अशा साठी की कदाचीत एखाद्या रात्री ढगांमुळे आकाशनिरिक्षण निट करता आले नाही, किंवा वार्‍यामुळे दुर्बीण हलत असल्यामुळे जागा बदलावी लागली, किंवा जंगलात अथवा नजीकच्या टेकडीवर वणवा पेटल्यावर उजेडामुळे आकाशाचा बराचसा भाग निट दिसेनासा झाला, किंवा साप अथवा विंचू दिसल्या मुळे अथवा ईतर जनावरांनी येउन गोंधळ घातल्यामुळे, किंवा ऐन वेळी तब्येत बिघडल्यामुळे, जर अशा प्रकारे एखाद्या रात्री काही अडचणींमुळे मॅराथॉनमधे खंड पडल्यास दुसर्‍या किंवा तिसर्‍या रात्री पुन्हा मॅराथॉन पुर्ण करता येईल. बरेचदा आदल्या रात्री झालेल्या चुका नंतरच्या रात्री सुधारुन मेसिए वस्तू पाहिल्याचा आकडा वाढू शकतो.
       मेसिए मॅराथॉन साठी चांगली जागा शोधणे खुप महत्त्वाचे आहे. शक्यतो डोंगरावर किंवा गडावर जाउ नये, कारण दुर्बीण व ईतर सामान घेउन वर जाणे अवघड असते आणि रात्री जोरदार वार्‍यात दुर्बीण हाताळणे कठिण होते व गारठयामुळे त्रास होउ शकतो. म्हणून जागा शक्यतो माळरानावर असावी, जागेला शक्यतो कुंपन असावे ज्यामुळे जनावरे येउन गोंधळ घालू शकणार नाहित. निदान एक तरी पक्की खोली असावी, ज्यात दुपारी झोपता येईल व रात्री खायचे प्यायचे सामान व टेलेस्कोपची पिशवी अथवा खोकी ठेवता यावीत, आणि टॉयलेट व बाथरुम अत्यंत आवश्यक आहेत, थोडक्यात ४ दिवस राहता येईल ईतपत सोय असावी. या जागेवरुन चारही दिशांना क्षितिज दिसावे, पण जर अगदीच नाईलाज झाला तर क्षितिजा पासुन किमान १०अंशा पर्यंत आकाश दिसत नसेल तरिही हरकत नाही. दक्षिणेच्या आकाशात मेसिए वस्तू नसल्यामुळे त्या बाजूचे आकाश २०अंशा पर्यंत आकाश दिसले नाही तरिही चालेल, पण पुर्व व पश्चिमेस मात्र क्षितिजा पर्यंत आकाश दिसले पाहिजे. या जागेवर जास्तीत जास्त अंधार असावा, आजुबाजुला दिवे नसावेत आणि रस्त्यापासुन लांब असल्यास बरे अथवा त्या रस्त्यावर वाहतूक नसावी. थोड्क्यात सांगायचे तर उजेडा मुळे तारे तारकासमुह व मेसिए वस्तू दिसण्यात अडचण येणार नाही अशी जागा असावी.
       मॅराथॉनच्या दिवशी दुपारी ३ ते ४ तास झोप घेणे आवश्यक आहे, यामुळे रात्री जागणे सोपे जाते. जर संपुर्ण रात्र जागणे शक्य झाले नाही आणि झोप येत असेल तर रात्री २ ते ३ दरम्यान ३० ते ४५ मिनिटे झोपण्यास काहीच हरकत नाही (मात्र गजराचे घडयाळ जवळ ठेवावे). याचे कारण असे की दोन ते अडिच च्या सुमारास कन्या व सिंह रास डोक्यावर आली असेल तर कर्क रास व नरतुरंग तारकासमुह पुर्वेस उगवुन क्षितिजाच्या पुरेसे वर आलेले असतील, जर मॅराथॉन मधे पहिलेल्या मेसिए वस्तूंचा आकडा वाढवायचा असेल तर पहाटे ३ ते ५ हे दोन तास खुप महत्त्वाचे आहेत आणि त्यावेळेत झोपुन चालणार नाही.
       मॅराथॉन मधे भाग घेणार्‍यांनी रात्री झोप येउ नये म्हणून हलके जेवण घेणे आवश्यक आहे, शक्यतो पोटभर जेवू नये आणि संध्याकाळी ७ वाजता जेवावे, कारण ७:३० वाजता दुर्बीण तयार करुन मॅराथॉनसाठी सज्ज झाले पाहिजे. रात्री भुक लागते म्हणून खाण्यासाठी वेफर्स, बिस्किट्स, मॅगी नुडल्स, सँडविच, चपाती किंवा भाकरीचे भाजी भरुन तयार केलेले रोल्स, थालिपीठ, आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी व चहा किंवा कॉफी करुन घ्यावी. रात्री यातील बरेचसे पदार्थ थंड होतात म्हणून तशी मनाची तयारी ठेवा. दर तासाने ५ ते १० मिनीटांची विश्रांती घ्यावी यावेळेत खाणेपिणे आणि थोडा व्यायाम करावा. संपुर्ण रात्र दुर्बीण हाताळताना वाकल्यामुळे मान, खांदे, पाठ व कंबर यांवर ताण पडतो तर सतत उभे राहिल्यामुळे पाय दुखायला लागतात, म्हणुन विश्रांतीच्या काळात खालील व्यायाम करावेत.
मानेसाठी - सरळ उभे राहुन डोके आधी पुढे झुकवावे नंतर उजवीकडे, मागे व डावीकडे असे गोल फिरवावे. याच प्रकारे विरुद्ध दिशेने गोल फिरवावे.
खांद्यांसाठी - सरळ उभे राहुन खांदे पुढच्या दिशेने व नंतर मागच्या दिशेने गोल फिरवावे.
पाठ व कंबरेसाठी - पावलांत साधारण १ फुट अंतर ठेउन उभे रहावे, दोन्ही हात कंबरेवर ठेउन पुढे वाकावे आणि पाय स्थिर ठेउन धड उजवीकडे, मागे व डावीकडे असे गोल फिरवावे, नंतर विरुद्ध दिशेने गोल फिरवावे.
कंबर व पायासाठी - नमाज पढताना बसतात तसे जमिनीवर बसावे, हात सरळ वर करुन गुढघे जमिनीवरुन न उचलता शक्य तितके मागे झुकावे, जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ या स्थितीत राहुन परत बसलेल्या स्थितीत यावे.
       मॅराथॉनच्या वेळेस ढगळ कपडे घालु नयेत, शक्यतो घटट बसणारे पण सहज हालचाल करता येतील असे कपडे घालावेत. पायात बुट असावे अन्यथा मोज्यांसहित सँडल्सही चालतील. स्वेटर, हातमोजे व कानटोपी घालावी, पण मफलर घालणे टाळावे. कारण ढगळ कपडे व मफलर अडकून दुर्बीण हलण्याचा किंवा पडण्याचा संभव आहे.
       रात्री अंधारात याद्या, आकृत्या व दुर्बीण पाहण्यासाठी लाल जिलेटिन कागद लावलेले किंवा लाल डायोडचे छोटे टॉर्च वापरावेत.

       ही पोस्ट लिहिताना मी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार केलेला आहे, तरीदेखील एखाद्या गोष्टीचा उल्लेख राहुन गेला असण्याची शक्यता आहे. आपणास जर काही माहित असेल किंवा सुचवायचे असेल तर प्रतिक्रियांमार्फत कळवा.

       मेसिए मॅराथॉन करु ईच्छिणार्‍यांना शुभेच्छा!

सुचना -
       ही पोस्ट ज्यांना मेसिए मॅराथॉन करायची आहे त्यांना मार्गदर्शक ठरावी म्हणून मी माझ्या दृष्टिकोनातुन लिहीलेली आहे, आणि ती लिहीताना माझे अनुभव व विचार यांचा उपयोग केलेला आहे. मेसिए मॅराथॉन करताना कोणत्या गोष्टिंचा विचार करावा लागेल त्या सर्व गोष्टिंचा या पोस्ट मधे अंतर्भाव करायचा प्रयत्न केलेला आहे. तरिही ज्यांना मेसिए मॅराथॉन करायची आहे त्यांनी या पोस्ट मधे दिलेल्या माहितीचा वापर स्वतःच्या प्रकृती, सवयी आणि वकुबानुसार करावा. आणि जी साधने त्यांना उपलब्ध असतील त्या साधनांच्या सहाय्याने मेसिए मॅराथॉन पुर्ण करावी.

काही उपयुक्त वेबसाईट्स -
http://en.wikipedia.org/wiki/Messier_catalogue
http://en.wikipedia.org/wiki/Messier_marathon
http://www.deepskies.com/articles.cfm?intID=8
http://www.knoxvilleobservers.org/dsonline/tips/marathontips.html
http://www.maa.clell.de/Messier/E/Xtra/Marathon/mm-tips.html
Related Posts Plugin for WordPress, Blogger...