काही वर्षांनंतर माझ्या वाचनात बाळशास्त्री जांभेकर (१८१०-१८४६) यांचे लेख आले, आपण त्यांना "दर्पण" वृत्तपत्राचे संपादक आणि समाजसुधारक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध विषयांचे अध्ययन, अध्यापन व त्यांवर लेखन आहे, उदाहरणा दाखल सांगायचे झाले तर इतिहास, भुगोल, गणित. त्यांच्या खगोलशास्त्रातील कार्याविषयी माहिती आणि त्यांनी भारतात आधुनिक खगोलशास्त्राचा पाया घातला याची माहिती करून देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
जांभेकरांनी खगोलशास्त्र विषयक लेख दिग्दर्शन मासिकाच्या अंकांत प्रसिध्द करायला १८४१ मधे सुरुवात केली, या लेखांसोबत नक्षत्रांची रेखा चित्रे, आणि मराठीतील पहिला आकाशाचा नकाशा (दोन भागांत - उत्तरार्ध आणि दक्षिणार्ध) प्रसिद्ध केला, या नकाशांत दॄष्यप्रत ५ पर्यंतचे तारे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या लेखांमधे त्यांनी अनेक खगोलशास्त्रीय संज्ञा व संकल्पना सोप्या भाषेत सांगितल्या आहेत, उदा. क्रांति (declination), विषुवांश (Right ascension) आणि नक्षत्रांचे उदयास्तकालाचे कोष्टक देखील दिलेले आहे. लेखमालेतील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी सुचविलेली नक्षत्रांची मराठी नावे हा आहे. प्राचीन भारतीय खगोलविदांनी केवळ २७ नक्षत्रांना व १२ राशींना नावे दिलेली आहेत, पण खगोलनिरिक्षकांना विशिष्ट मर्यादे पलिकडे त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण या नक्षत्रांच्या मर्यादा उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशा आहेत. त्यामूळे निरिक्षण करावयाच्या तार्याचे स्थान निश्चित करणे फार अवघड होते. यावर उपाय म्हणून जांभेकरांनी पाश्चात्यांनी आकाशाचे भाग पाडून केलेली नक्षत्रे स्विकारली व त्यांना मराठी नावे सुचविली. हि नावे सुचविताना त्यांनी काही नावांचे भाषांतर केले तर काही ठिकाणी नवीन नावे सुचविली आहेत.
या नावांसाठीचे निकष त्यांच्याच शब्दांत, "नक्षत्रांस नावे मराठीत देतेवेळेस प्रसिद्ध पशूंची किंवा यंत्रादिकांची जी नावें तीं भाषांतर करुन तशीच ठेविली आहेत. ग्रीक लोकांच्या प्राचीन कथांतील देवतांची नावे फिरवून हिंदू लोकांच्या पुराणांत त्याप्रकारचे कांही कथासंदर्भ जे मिळाले, त्यांस अनुसरून देवदेवतांच्या संज्ञा केल्या आहेत. हिंदूमध्ये प्रसिद्ध ज्या राशी आणि नक्षत्रें त्यांची नावे न फिरवितां तशीच राखिली आहेत".
नक्षत्रांच्या नावांची काही उदाहरणे –
देवयानी - आंद्रोमीदा. ही सिफियस यपासून क्यासिओपिया हिची कन्या. हीच्या आईने सौंदर्याचा गर्व केल्यामुळे समुद्राच्या देवतेचा कोप झाला, तो शांत करण्यासाठी आईबापांनी समुद्रांत सोडून दिली, तेथून पुढें पर्सियस राजाने हिला (समुद्रातून) काढून तिच्याशी लग्न केले, अशी कथा आहे. या कथेसारखेंच देवयानीचे चरित्र पुराणांत वर्णिले आहे, म्हणोन या नक्षत्रास हे नाव दिलें आहे.
ययाति - पर्सियस. हा आंद्रोमीदेचा नवरा. याणें मिडुसा हा राक्षस मारला, त्याचें शीर या नक्षत्रांत काढले असतें.
हंस - सिग्नस, म्हणजे हंस. ज्युपिटर देवानें कोणे समयी हंसाचे रुप धारण केलें होतें, त्यावरुन याचे नाव पडलें.
शशक - लीपस, म्हणजे ससा.
सूक्ष्मदर्शी - मायक्रॉसकोपियम्. लहान पदार्थ मोठे दिसण्याचे यंत्र.
भारतातील आधुनिक खगोलशास्त्राचे जनक
पुर्वी जगभर फलज्योतिष आणि खगोलशास्त्रात फरक केला जात नसे, दोन्हींचे अध्ययन व अध्यापन एकत्रच चालायचे. युरोप मधे १६ व्या शतकाच्या मध्यास वैज्ञानिक क्रांतीस (Scientific Revolution) सुरुवात झाली आणि फलज्योतिष आणि खगोलशास्त्राचे मार्ग वेगळे झाले, मात्र भारतात यासाठी बराच काळ जावा लागला. १९ व्या शतकात ईंग्रजांनी भारतात पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणास सुरूवात केली आणि त्या मार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होऊ लागला. सुरवातीच्या काळात ईंग्रजीचे शिक्षण घेणार्या काही भारतीयांनी पाश्चात्य ज्ञान एतद्देशीय भाषांत आणले आणि भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व विज्ञानाचा पाया घातला, यांत बाळशास्त्री जांभेकरांचे नाव अग्रभागी घेतले जाते.
बाळशास्त्री जांभेकर यांचे भारतातील खगोलशास्त्रास योगदान –
१. नक्षत्रांचे भारतीय नामकरण (भारतीयीकरण).
२. आकाशाचा नकाशा पहिल्यांदा भारतीय भाषेत तयार करवून घेतला आणि प्रसिद्ध केला.
३. नक्षत्रांची चित्रे (आकृती) पहिल्यांदा भारतीय भाषेत तयार करवून घेतली आणि प्रसिद्ध केली.
४. खगोलशास्त्रातल्या संज्ञा व संकल्पनांचे स्पष्टिकरण सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असे लिहून प्रसिद्ध केले.
५. उदयास्त काल निश्चिती कशी करावी यावर लिखाण व त्या साठी लागणारी कोष्टके तयार केली.
६. दिग्दर्शन मासिकातील एका उल्लेखानूसार त्यांनी तार्यांचा गोल (Star globe) बनविण्याचे ठरविले होते, परंतू आज या गोलाविषयी कोणतीही अधीक माहिती उपलब्ध नाही.
जांभेकरांपूर्वी किंवा समकालीन खगोलशास्त्रज्ञ भारतात नव्हते का?
आधुनिक खगोलशास्त्र भारतात आणण्याचे श्रेय पाश्चात्यांना जाते, फ्रेंच व इंग्लिश खगोलशास्त्रज्ञांनी १७ व्या आणि १८ व्या शतकात भारतातून ग्रहणांची व तार्यांची निरीक्षणे केली, परंतु त्यात भारतियांचा सहभाग नव्हता. (संदर्भ)
मद्रास वेधशाळा (Madras Observatory) - ईस्ट इंडीया कंपनीने १७८६ मध्ये मद्रास येथे वेधशाळेची स्थापना केली. या वेधशाळेत अनेक इंग्रज खगोलशास्त्रज्ञ कार्यरत होते, मात्र सुरुवातीच्या काळात भारतीयांची खगोलशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झालेली आढळत नाही. मद्रास वेधशाळेत भारतीयाने केलेल्या पहील्या निरीक्षणांची नोंद सी. रघूनाथचारी यांची आहे, त्यांना १८६७ मध्ये रुपविकारी तार्याच्या शोधाचे श्रेय दिले जाते. (संदर्भ १, संदर्भ २)
महाराज सवाई जयसिंह - यांनी १७२४ ते १७३५ या काळात उत्तर भारतात ५ शहरांत वेधशाळा बांधल्या. पण यामागचा त्यांचा उद्देश मात्र वेधांत अचुकता यावी व त्यामूळे शुभ काल आणि अशुभ काल याचे अचूक निदान होईल हा होता. या वेधशाळांचा उपयोग फलज्योतिषासाठी करण्यात आला म्हणून महाराज सवाई जयसिंह व त्यांच्या वेधशाळेतील ज्योतिषांना आधुनिक खगोलशास्त्रज्ञ म्हणता येणार नाही. (संदर्भ १, संदर्भ २)
बाळशास्त्री जांभेकरांनी खगोलशास्त्राची माहिती व प्रसार व्हावा म्हणून अनेक लेख लिहीले, आकाशाचे नकाशे आणि नक्षत्रांची चित्रे बनविली, आकाशनिरिक्षणास आवश्यक कोष्टके तयार केली, नक्षत्रनामांचे भारतीयीकरण केले आणि भारतात आधुनिक खगोलशास्त्राचा पाया घातला. या माहिती आधारे निश्चितपणे असे म्हणता येईल की बाळशास्त्री जांभेकर हे भारतातील आधुनिक खगोलशास्त्राचे जनक आहेत.
संदर्भग्रंथ - Memoirs and Writings of Acharya Balshastri Jambhekar Vol 1, Vol 2 and Vol 3.
4 प्रतिक्रिया:
सुंदर माहिती. तुम्हाला शक्य झाले तर बाळशास्त्री जांभेकरांनी खगोलशास्त्राची कोणत्या पाश्चात्य तारकांची नावे मराठीत आणली याची यादी देता आली तर खूप छान होईल
@सागर,
आजकाल प्रचलित असलेली नक्षत्रांची मराठी नावे बाळशास्त्री जांभेकरांनी सुचवलेली आहेत. तुम्हाला हवी ती यादी/माहिती आत्ता तयार नाही, व यासंबधीचे काम चालू आहे. काही दिवसांनी ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या संस्थळावर व या ब्लॉग वर याविषयीची माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल.
धन्यवाद.
sundar... tumhi june murlele shipai vatata....
तुम्ही तर जुने मुरलेले शिपाई वाटता...
टिप्पणी पोस्ट करा