बोली, भाषा आणि परिभाषा

       ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ते २८ मार्च २०१० रोजी पुण्यात संपन्न झाले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी यांनी केलेले भाषण नुकतेच माझ्या वाचण्यात आले, आणि वाचल्यावर मनात जे विचार आले ते मांडणे हा या पोस्टचा उद्देश आहे.

       अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेत लिहिणारे आणि वाचणारे यांचे संमेलन आहे आणि या संमेलनातील अध्यक्षीय भाषण हा मुख्य कार्यक्रम असतो. या भाषणातून संमेलनाध्यक्ष श्रोत्यांशी व वाचकांशी संवाद साधतात व मार्गदर्शन करतात. या भाषणातुन अध्यक्षांनी मराठी लेखक वाचकांना मार्गदर्शन करावे व सद्यपरिस्थितीत मराठी भाषेची स्थिती, तिच्यापुढील आव्हाने व सहित्यजगतातील नवीन घडामोडी यांवर आपले मत मांडावे हि अपेक्षा असते. या अपेक्षेस संमेलनाध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण पुरेपुर उतरले की नाही यावर अनेक माध्यमांतुन आणि वर्तमानपत्रांतुन बरेच लिखाण झाले आहे, त्यातील काही माझ्या वाचनात आले आणि माझी उत्सुकता चाळवली गेली व साहित्य संमेलनाच्या संस्थळावरुन मी ते भाषण उतरवले आणि वाचले.

       या भाषणात संमेलनाध्यक्षांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे. उदा. स्वतःच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे उल्लेख, हौशे, नवशे व गवशे यांचा साहित्य संमेलनाशी असलेला संबंध, ज्ञानेश्वरीतल्या सौंदर्यस्थळांचे विश्लेषण, भाषाशुद्धी व भाषासमृद्धी कशी होईल, साहित्याची भाषा म्हणजे काय? व काव्यार्थ म्हणजे काय? याचे विवेचन, मराठी भाषेपुढील आव्हाने. यासोबत त्यांनी महाराष्ट्र शासनास निर्देशन, व साहित्यकारांस साहित्यमुल्य संवर्धनाविषयी मार्गदर्शन ही केले आहे. या पोस्टमधे त्यांच्या भाषणातील काही मुद्यांचा विचार करुया.

       बोली, भाषा आणि परिभाषा यांतील नेमका फरक दाखवून देताना संमेलनाध्यक्ष म्हणतात की "बोली" जनसामान्यांची असते, ती प्रवाही, नादमधुर आणि भावोत्कट असते व तिचे प्रभावक्षेत्र सीमित आहे. तर "भाषा" ही ग्रंथनिविष्ट, व्याकरणनीष्ठ व शिष्टसंमत असते तिच्यात माधुर्य व भावनिकता कमी पण वैचारिकता अधिक असते. यात काहीच संषय नाही की कोकणी ही बोली कोकण व मुंबई परिसरापुरती तर विदर्भात वर्‍हाडी व उत्तर महाराष्ट्रात खानदेशी बोलली जाते व त्यांचा वापर विशिष्ट भागातच प्रामुख्याने होतो. थोडा तटस्थपणे विचार केला तर हे पटते की बोलीस भौगोलीक मर्यादा आहेत व मालवणहुन कोणी नागपुरला गेले आणि कोकणीत बोलायला लागले तर संवाद करणे अशक्य होईल, अशा परिस्थितीत प्रमाणमराठीत संवाद साधने अधिक योग्य आहे. पण येथे अजुन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की प्रमाणमराठी कोणती? माझ्या मते सध्याच्या पाठयपुस्तकीय मराठीस प्रमाण भाषा म्हणावे; परंतु सर्व बोलींतून उपयुक्त शब्द घेऊन प्रमाण मराठीस अधीक व्यापक बनविणे गरजेचे आहे अन्यथा काही भागांतील लोकांवर प्रमाण भाषा लादली आहे असा आरोप केला जाईल. प्रमाण भाषा कोठेही, केव्हाही आणि कोणावरही लादली जाउ नये असे मला वाटते. जेव्हा दोन किंवा अधिक बोली बोलणार्‍यांना संबोधीत करावयाचे असेल किंवा त्याच्यासाठी लिखीत मजकुर तयार करावयाचा असेल तेव्हा प्रमाण भाषेचा वापर करावा. उदा. शासनाचे कामकाज, न्यायालयांतील कामकाज, उत्पादनांच्या जाहिराती व माहितीपुस्तके ई. याउलट साहित्यनिर्मिती शक्य होईल तेवढी बोलींमधे करावी व दैनंदीन व्यवहारात बोलींचाच प्रामुख्याने वापर करावा. यामुळे बोलींचे संवर्धन होईल व त्या टिकुन राहण्यास मदत होईल. परिभाषेचे स्वरुप मात्र बोली व भाषेपेक्षा वेगळे आहे. माझ्यामते विवीध ज्ञानशाखांत, विज्ञान-तंत्रज्ञान व खेळांत परिभाषेचा उपयोग होतो आणि या सर्व ठिकाणी परिभाषेचाच वापर केला जाणे आवश्यक आहे अन्यथा अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता जास्त आहे. आणि संमेलनाध्यक्षांच्या मते केवळ परिभाषिक शब्द व इतर भाषांतील शब्द जसेच्यातसे वा भाषांतर करुन मराठीत आणल्याने भाषासमृद्ध होणार नाही तर त्याजोडीला बोलींतील शब्द देखील प्रमाणभाषेत स्विकारणे व परभाषेतेल व परिभाषेतील शब्द सुयोग्य भाषांतर करुन त्यांचा भाषेत सहभाग केला गेला पाहिजे. याठिकाणी त्यांनी शब्दांचे कुल म्हणजे काय व शब्दकुलांची उदाहरणे दिली आहेत, हे सर्व निश्चितपणे चिंतनीय आहे.

       याशिवाय जालनीशीकारांचा उल्लेख करताना संमेलनाध्यक्ष म्हणतात, "मराठी साहित्य विश्वसंचारी होण्यासाठी इंटरनेट आणि ब्लॉग या साधनांचा वापर आवश्यक आहे. नव्या पिढीने त्याचा मोठ्या प्रमाणात अंगीकार केला आहे, ही अभिमानाची बाब आहे". याप्रकारे संमेलनाध्यक्षांनी आंतरजालावर निर्माण होत असलेल्या साहित्याची दखल घेतली हेही नसे थोडके. माझ्यामते आंतरजालावरील साहित्यात सतत भर पडत आहे, उत्तम कथा, कविता, कादंबर्‍या आंतरजालावर उपलब्ध होत आहे, आणि उत्तरोत्तर त्यात वाढच होईल यात शंका नाही. बर्‍याच जालनीशीकारांचे साहित्य वर्तमानपत्रांत व मासिकांत पुनर्मुद्रण होते आहे व हळुहळु वाचकांचा दृष्टिकोन ही बदलताना दिसत आहे. आंतरजालावर साहित्य निर्मिती व प्रकाशन अत्यंत सुलभ आहे, व वाचकांसाठी साहित्य सहज उपलब्ध असते व त्यांना साहित्यिकाशी संवाद सुलभपणे साधता येतो, यामुळे येत्या काही दिवसांत आंतरजालावरील साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक वाढ निश्चितपणे होईल यात काहीच शंका नाही.

       आपल्या भाषणाच्या शेवटी संमेलनाध्यक्ष, मराठी भाषेवरील आक्रमण, अभिव्यक्तीस्वातंत्य्र व साहित्यनिर्मीतीत आलेल्या उथळपणा व साहित्यनिर्मीतीमागे असावी लागणारी वैचारीक बैठकी बाबत आपले विचार सांगतात. ते मुळ भाषणातुन वाचणे अधीक योग्य ठरेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० च्या संकेतस्थळावर हे भाषण उपलब्ध आहे, त्याचा दुवा - http://www.sahityasammelan2010.com/sites/default/files/pdf/D_B_Kulkarni_Bhashan.pdf
Related Posts Plugin for WordPress, Blogger...